वाढत्या आयातीमुळे तूट १४.७३ अब्ज डॉलर; जानेवारीत आयात ४१.०९ अब्ज डॉलर

वाढत्या आयातीपोटी देशातील व्यापार तूट २०१९ च्या सुरुवातीलाच वाढली आहे. जानेवारीमध्ये आयात-निर्यातीतील दरी १४.७३ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे. व्यापार तुटीने डिसेंबरमध्ये गेल्या १० महिन्यांचा तळ नोंदविला होता. २०१८ च्या अखेरच्या महिन्यात व्यापार तूट १३.०८ अब्ज डॉलर झाली होती.

देशाची आयात वर्षांरंभी ४१.०९ अब्ज डॉलर झाली असून ती आधीच्या ४१.०१ अब्ज डॉलर तुलनेत यंदा किरकोळ वाढली आहे. वर्षभरापूर्वी, याच कालावधीत ती ४१.०८ अब्ज डॉलर होती. भारताची तेल आयात ३.५९ टक्क्य़ाने कमी होत ११.२४ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे. जानेवारी २०१८ मध्ये ती ११.०९ होती. यंदाच्या जानेवारीत खनिज तेलाच्या किंमती १४.०९ टक्क्य़ांनी घसरल्या आहेत. तर एप्रिल २०१८ ते जानेवारी २०१९ दरम्यान तेल आयात ३६.६५ टक्क्य़ांनी वाढून ११९.३४ अब्ज डॉलर झाली आहे.

जानेवारीमध्ये निर्यात वाढून २६.३६ अब्ज डॉलर झाली आहे. ती जानेवारी २०१८ मधील २५.४१ अब्ज डॉलरपेक्षा यंदा वाढली असली तरी डिसेंबर २०१८ मधील २७.९३ अब्ज डॉलरच्या तुलनेत कमी आहे. गेल्या महिन्यात सोने आयात ३८ टक्क्य़ांनी उंचावत २.३ अब्ज डॉलर झाली आहे. तर रत्ने व दागिने निर्यात ६.६७ टक्क्य़ांनी वाढून ३.२४ अब्ज डॉलर झाली आहे.

विदेशी राखीव गंगाजळीला ओहोटी

देशातील विदेशी राखीव गंगाजळी ८ फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवडय़ात २.११ अब्ज डॉलरने घशरून ३९८.१२ अब्ज डॉलपर्यंत येऊन ठेपली आहे. विदेशी चलन मालमत्तेतील घसरणीमुळे असे घडले आहे. चालू महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात देशातील विदेशी राखीव गंगाजळी २.०६ अब्ज डॉलरने वाढत ४००.२४ अब्ज डॉलर नोंदली गेली होती.

विदेशी राखीव गंगाजळी यापूर्वी ४२६.०२ अब्ज डॉलर अशा विक्रमी टप्प्याला १३ एप्रिल २०१८ अखेरच्या आठवडय़ात पोहोचली होती. त्यानंतर त्यात सातत्याने घसरण होत आहे. आतापर्यंत त्यात ३१ अब्ज डॉलर घसरण झाली आहे. राखीव सोने मात्र यंदा २२.६८ अब्ज डॉलर असे स्थिर राहिले आहे.