News Flash

अर्थवेग झोकात!

गेल्या १५ तिमाहीतला सर्वोच्च विकासदर, चीनलाही मागे टाकले

अर्थवेग झोकात!

गेल्या १५ तिमाहीतला सर्वोच्च विकासदर, चीनलाही मागे टाकले

निश्चलनीकरण तसेच वस्तू आणि सेवा करामुळे गेल्या दोन वर्षांत अर्थव्यवस्था तळात विसावल्याची चर्चा असतानाच चालू वित्त वर्षांची सुरुवात मात्र झोकात झाल्याचे शुकवारच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर ८.२ टक्क्यांवर झेपावला आहे.

उत्पादन आणि कृषी क्षेत्र वाढीच्या जोरावर यंदाचा तिमाही अर्थवेग गेल्या १५ तिमाहीतील सर्वोच्च नोंदला गेला आहे. यापूर्वीचा सर्वोत्तम, ८.४ टक्के हा तिमाही दर जुलै ते सप्टेंबर २०१४ दरम्यान होता. देशाचा यंदाचा विकास दर हा चीनच्या ६.७ टक्क्यालाही मागे टाकणार आहे. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत निर्मिती क्षेत्राची वाढ १३.५ टक्के तर कृषी क्षेत्राची वाढ ५.३ टक्के नोंदली गेली.

तमाम अर्थतज्ज्ञ, बँका तसेच दलालीपेढींचे प्रमुख यांच्यामते हा दर ७.६ टक्के एवढा राहण्याची शक्यता होती. मात्र त्यांच्या अंदाजापेक्षा हा विकास दर खूपच पुढचा आहे.

वर्षभरापूर्वीच्या, एप्रिल ते जून २०१७ दरम्यानच्या ५.६ टक्के तसेच आधीच्या तिमाहीतील, जानेवारी ते मार्च २०१८ मधील ७.७ टक्के दराच्या तुलनेत यंदाचा विकास दर अधिक असल्याबद्दलही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षांतील ६.७ टक्के दरानंतर पहिल्या तिमाहीच्या उत्साहामुळे आता २०१८-१९ मध्ये विकास दर ७.५ टक्क्यांपर्यंत पुढे जाण्याचा आशावाद व्यक्त केला जात आहे.

रुपया आणखी खोलात

डॉलरच्या तुलनेतील रुपयाची गेल्या अनेक सत्रातील सातत्याची घसरण सुरूच असून शुक्रवारी डॉलरचा भाव ७१ रुपयापर्यंत गेला. परकी चलन विनिमय मंचावर रुपयात सप्ताहअखेर तब्बल २६ पैशांची आपटी अनुभवली गेली. ७०.९५ वर सुरुवात करणाऱ्या रुपयाने कसाबसा ७०.८५ हा वरचा स्तर राखला. आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन दरातील वाढ तसेच बँक आणि आयातदारांकडून नोंदले गेलेल्या महिनाअखेरच्या मागणीमुळे रुपयावर दिवसअखेर दबाव निर्माण झाला. चालू सप्ताहात रुपया १.५५ टक्क्यांनी नरमला आहे. तर वर्षभरातील त्याची आपटी ११ टक्क्यांची राहिली आहे. वर्षभरापूर्वी रुपया डॉलरसमोर ६४ पर्यंत भक्कम होता.

देशाची आर्थिक स्थिती भक्कम आहे, हेच यावरून स्पष्ट होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अस्थिरता लक्षात घेता भारताची ही कामगिरी खूपच उत्साहवर्धक आहे.  – बिबेक देबरॉय, पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार

‘एस अ‍ॅण्ड पी’ मानांकन वाढवण्याची मागणी

स्टॅण्डर्ड अ‍ॅण्ड पूअर्स या आंतरराष्ट्रीय मानांकन संस्थेने भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत आणि गुंतवणूक सुरक्षेबाबत दिलेले ‘बीबीबी’ हे सर्वात तळातले मानांकन आता रद्द करावे, यासाठी अर्थ मंत्रालयाने पाठपुरावा सुरू केला आहे.

इंधनही महागले

देशातील इंधनाच्या दरात शुक्रवारी सकाळी वाढ झाली. मुंबईत पेट्रोल लिटरमागे २१ पैशांनी, तर डिझेल तब्बल ३० पैशांनी महागले आहे. मुंबईत पेट्रोलचा दर लिटरमागे ८५ रुपये ९३ पैसे, तर डिझेलचा दर ७४ रुपये ५४ पैसे झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2018 1:24 am

Web Title: economy of india 7
Next Stories
1 …म्हणून उद्यापासून कार व मोटरसायकल महागणार!
2 रूपयाची ऐतिहासिक घसरण, अशाप्रकारे सामान्यांना बसणार फटका
3 डॉलरच्या तुलनेत रूपयाची ऐतिहासिक घसरण
Just Now!
X