करोना कहर आणि नंतरच्या सक्तीच्या टाळेबंदीच्या परिणामी भारतीय अर्थव्यवस्थेत स्वातंत्र्योत्तर चार दशकांतील भीषण घसरणीचा अंदाज करण्यात आला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ)ने गुरुवारी जाहीर केलेल्या भाकितानुसार, शेती क्षेत्र वगळता अन्य क्षेत्रांतील घसरणीमुळे अर्थ वर्ष २०२०-२१मध्ये अर्थव्यवस्था ७.७ टक्क्यांनी संकोचेल, असे म्हटले आहे. २०१९-२०मध्ये अर्थव्यवस्थेत ४.२ टक्के वाढ होती.
केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला जाण्यापूर्वी मांडल्या जाणाऱ्या पहिल्या आगाऊ अंदाजानुसार, देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपी चालू आर्थिक वर्षांत ७.७ टक्क्यांनी आक्रसेल, असे ‘एनएसओ’ने गुरुवारी स्पष्ट केले. यापूर्वी भारताच्या जीडीपीमध्ये आर्थिक वर्ष १९७९-८० मध्ये उणे ५.२४ टक्क्यांची घसरण दिसून आली होती. तथापि यंदाचा उणे ७.७ टक्क्यांचा आगाऊ अंदाज, स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वात तीव्र स्वरूपाचे आकुंचन ठरेल, असे ‘एनएसओ’ने संकलित केलेली आकडेवारी दाखवून देते. चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल ते जून तिमाहीत अर्थव्यवस्थेची उणे २३.९ टक्क्यांनी तर जुलै-सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेला उणे ७.५ टक्क्यांनी घरघर लागल्याचे दिसून आले. रिझव्र्ह बँकेसह बहुतांश विश्लेषकांनी तिसऱ्या व चौथ्या तिमाहीत अर्थव्यवस्था सकारात्मक वाढ नोंदवेल, असे भाकीत केले आहे. एकंदरीत संपूर्ण आर्थिक वर्षांवर पहिल्या दोन तिमाहीतील भीषण घसरणीचा प्रभाव राहील, असेच एनएसओचा हा पूर्वअंदाज स्पष्ट करतो. चालू आर्थिक वर्षांत निर्मिती क्षेत्रात सर्वाधिक ९.४ टक्क्यांनी अधोगती दिसून येईल. आधीच्या २०१९-२० मध्ये अर्थव्यवस्थेच्या या घटकामध्ये अवघी ०.०३ टक्के वाढ दिसून आली होती. बरोबरीने खाणकाम, व्यापार, आतिथ्य, वाहतूक, दूरसंचार आणि प्रक्षेपणाशी निगडित सेवांमध्ये तीव्र स्वरूपाचा उतार अनुभवास येईल.
केवळ कृषी क्षेत्रात सकारात्मक ३.४ टक्क्यांची वाढ अनुभवता येईल. मात्र गेल्या वर्षी या क्षेत्राने दाखविलेल्या ४ टक्क्यांच्या प्रगतीच्या तुलनेत तीही यंदा तोकडीच असेल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 8, 2021 1:08 am