निर्ढावलेल्या सहेतुक कर्जदारांकडून १०० कोटी वसूल; किंगफिशर एअरलाइन्सकडून मात्र ५९७.४४ कोटींचे येणे

हिरे व्यापारी नीरव मोदीच्या १४,००० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यामुळे चर्चेत आलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेच्या थकीत कर्जवसुलीत ऑगस्टमध्ये सुधार नोंदला दिसला आहे. जुलैमधील १५,१७५ कोटी रुपयांच्या तुलनेत ऑगस्टमधील थकीत कर्ज रक्कम १५,०७५.०७ कोटी रुपये राहिली आहे.

प्रत्येकी २५ लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज थकविणाऱ्यांची मासिक यादी पंजाब नॅशनल बँकेने जाहीर केली आहे. या यादीमध्ये विजय मल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्सचाही समावेश आहे. ताज्या यादीनुसार यंदाच्या ऑगस्टमधील थकीत कर्जरक्कम जुलैच्या तुलनेत काहीशी सुधारली आहे.

ऑगस्ट २०१८ अखेर किंगफिशर एअरलाइन्सकडील थकीत कर्ज ५९७.४४ कोटी रुपये आहे. तर १,३०१.८२ कोटी रुपये थकीत रकमेसह कुडोस केमि लिमिटेड ही कंपनी बँकेच्या निर्ढावलेल्या कर्जदारांमध्ये अव्वल राहिली आहे. तर विनसम डायमंड्सकडून बँकेला ८९९.७० कोटी येणे आहे.

नीरव मोदीने बँकेला १४,००० कोटी रुपयांनी फसविल्याचे फेब्रुवारी २०१८ मध्ये उघडकीस आले. परिणामी मार्च २०१८ अखेरच्या वर्षांत बँकेने १२,२८३ कोटी रुपयांचा तोटा नोंदविला. तर २०१८-१९ या चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीतील तोटा ९४० कोटी रुपयांचा होता.

वर्षअखेर पुन्हा नफ्याला गवसणी – सुनील मेहता

वर्षांरंभी थकीत कर्ज फसवणूक समोर आल्यानंतर इतिहासातील सर्वात मोठय़ा तिमाही तोटय़ाला सामोरे गेलेली पंजाब नॅशनल बँक चालू वित्त वर्षांतच पुन्हा नफा नोंदवेल, असा विश्वास बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांनी व्यक्त केला. बँकेने केलेल्या उपाययोजनांमुळे मार्च २०१९ पर्यंत नफा दृष्टिक्षेपात असून, बँक पुन्हा एकदा व्यवसाय वाढीच्या दिशेने प्रवास करू लागेल, असे त्यांनी सांगितले. जून २०१७ अखेरच्या तिमाहीत ३४३.४० कोटी रुपयांचा नफा कमावणाऱ्या या बँकेने वर्षभरात ९४० कोटी रुपयांचा तोटा नोंदविला. एकूण सार्वजनिक बँक क्षेत्राला मिळालेल्या ६५,००० कोटी रुपयांच्या अर्थसाहाय्यामध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या वाटय़ाला ८,२४७ कोटी रुपयांचे अर्थपाठबळ केंद्र सरकारकडून मिळाले आहे.