केंद्र सरकार आणि मध्यवर्ती बँकेकडून परिस्थितीजन्य लवचीकता दाखवत मौद्रिक आणि वित्तीय धोरणांचा सातत्याने पाठपुरावा केला गेल्याने, देशाची अर्थव्यवस्था आता पुनरुज्जीवनाच्या उंबरठय़ावर येऊन ठेपली आहे, असे प्रतिप्रादन रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी केले.

माजी नोकरशहा आणि वित्त आयोगाचे वर्तमान अध्यक्ष एन. के. सिंग यांनी लिहिलेल्या ‘पोर्ट्रेट्स ऑफ पॉवर : हाफ सेंच्युरी ऑफ बीइंग अ‍ॅट रिंगसाइड’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात दास बोलत होते. ते म्हणाले, ‘‘आपण जवळजवळ पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेच्या उंबरठय़ावर पोहोचलो असून, अशा समयी वित्तीय संस्थांकडे (अर्थवृद्धीला पाठबळ देण्यासाठी) पर्याप्त स्वरूपात भांडवल असणे नितांत आवश्यक आहे.’’

बँकांनी भांडवलदृष्टय़ा सक्षम असण्याची गरज प्रतिपादित करताना, त्यांनी अनेक बँकांनी भांडवल उभारणी केली आहे आणि अन्य अनेकांच्या तशा योजना तयार आहेत, त्या पुढील काही महिन्यांत निश्चितच त्या पूूर्णत्वाला नेतील, असेही दास यांनी नमूद केले.

करोनाकाळाने निर्माण केलेल्या आव्हानांचा भारताने वित्तीय व्याप्ती वाढवून समर्थपणे सामना केला. एकदा करोनाच्या संक्रमणावर नियंत्रण मिळविले गेले तर मात्र भारताने अनुसरायच्या वित्तीय शिस्तीच्या मार्गाची आखणी सरकारला करावी लागेल. मौद्रिक आणि वित्तीय धोरणांनी एकसूत्रता राखतानाच, बदलत्या परिस्थितीला अनुकूल लवचीकता दाखविणे आवश्यकच असल्याचे त्यांनी सांगितले.