‘बिग बिलियन डे’ सेल करणारी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टला अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावली असून याबाबतच्या चौकशीत काही त्रुटी आढळल्यास कंपनीला एक हजार कोटींचा दंडाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
फ्लिपकार्ट या कंपनीने ६ ऑक्टोबर रोजी ‘बिग बिलियन डे’ नावाखाली विक्रीचे आयोजन केले होते. त्या दिवशी अवघ्या दहा तासांत सुमारे १० लाख ५० हजार ग्राहकांना ६०० कोटींची खरेदी केली. या विक्री दिनाच्या दिवशी कंपनीकडून किरकोळ विक्रीच्या नियमांमध्ये काही गडबड झाली नाही ना हे तपासण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने कंपनीला नोटीस बाजावली आहे.
आत्तापर्यंत कंपनीच्या विरोधात कोणतेही पुरावे आढळले नसून तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तर आम्ही कायदाचा सन्मान करत असून संबंधित प्राधिकारणाला आम्ही पूर्ण सहकार्य करू असे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
या चौकशीत कंपनी दोषी आढळली तर त्यांना एक हजार कोटी रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकेल अशी शक्यताही आहे.
ई-रिटेलवरील किंमतींवर नियंत्रण आणावे यासाठी किरकोळ व्यापारी संघटना सक्रीय झाल्या असून याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल असे वाणिज्य आणि उद्योग मंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच स्पष्ट केले होते.