महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह््यातील बहुचर्चित जैतापूर अणू वीजनिर्मिती प्रकल्पात ईपीआर धाटणीच्या सहा अणुभट्ट्यांसाठी अभियांत्रिकी तज्ज्ञता आणि उपकरणे पुरवण्यासाठी तंत्र-वाणिज्य करार फ्रेंच कंपनी ईडीएफकडून सादर करण्यात आला आहे. हा बंधनकारक करार म्हणजे जगातील सर्वात मोठा आण्विक वीजनिर्मिती प्रकल्प भारतात साकारला जाण्यातील अंतिम व महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

हा करार पुढे नेण्याच्या दृष्टीने ईडीएफ आता, न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात एनपीसीआयएलसोबत मिळून काम करणार आहे. येथील अणुभट्ट्यांचा संपूर्ण तांत्रिक आराखडा, त्यासाठी आवश्यक असणारी सर्व उपकरणे व सुटे भाग यांच्या पुरवठ्यासाठी संबंधित सर्वसमावेशक व्यावसायिक नियम, अटी हे या कराराचा भाग आहेत.

जैतापूर प्रकल्पातील सर्व सहा एककांची उभारणी व कार्यान्वयनासाठी भारतातील सर्व आवश्यक परवानग्या आणि मंजुऱ्या, ज्यात भारतीय सुरक्षा नियामकांकडून ईपीआर तंत्रज्ञानाचे प्रमाणन मिळवण्याचाही समावेश आहे, त्या मिळविण्याची जबाबदारी या प्रकल्पाची मालकी असणाऱ्या आणि भविष्यातील चालक म्हणून एनपीसीआयएलकडे असणारआहे. बांधकामाच्या टप्प्यात एनपीसीआयएलला ईडीएफ आणि त्यांच्या भागीदार साहाय्यकांकडून ‘ईपीआर’ तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पांशी संबंधित ज्ञान व अनुभवाचा फायदा मिळू शकतो.