व्यापार प्रतिनिधी, मुंबई

वीज वितरण कंपन्यांच्या देशभरात स्मार्ट मीटर बसवण्याच्या योजनेची अमंलबजावणी, वित्त पुरवठा आणि परिचालनासाठी नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्रर फंड (एनआयआयएफ) आणि एनर्जी एफिशिअन्सी सव्‍‌र्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) यांनी इंटेलिस्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (इंटेलिस्मार्ट) या संयुक्त उपक्रमाची घोषणा केली आहे.

ऊर्जेच्या विविध पर्यायांच्या मिश्रणातून उभी राहणारी आव्हाने आणि प्रत्येक भारतीयाला  २४ तास अव्याहत वीज पुरवठा करण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट यांची पूर्तता करण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या स्मार्ट ग्रिडचा पाया स्मार्ट मीटर्सच्या माध्यमातून रचला जाणार असल्याची माहिती कंपन्यांमार्फत देण्यात आली.

येत्या काही वर्षांत २५ कोटी स्मार्ट मीटर बसवण्याची भारत सरकारची योजना असून जुन्या पारंपरिक मीटरची जागा स्मार्ट मीटरने घेतल्यावर विजेच्या प्रत्यक्ष वापरानुसार देयक बनवण्याच्या क्षमतेत ८० ते १०० टक्कय़ांनी सुधारणा होणार आहे; शिवाय वीज वितरण कंपन्यांच्या उत्पन्नात १ लाख १० हजार ४०० कोटी रुपयांची वाढ करण्याची यात क्षमता असून देशात स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेचे नेतृत्व ईईएसएल करत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

आजवर ६ लाख २५ हजारहून अधिक स्मार्ट मीटर बसवण्यात आले असून एनआयआयएफ आणि ईईएसएलच्या या भागीदारीमुळे भारत सरकारच्या स्मार्ट मीटर महत्त्वाकांक्षेला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या संयुक्त उपक्रमाची घोषणा करताना ईईएसएलचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ कुमार म्हणाले, सर्वसमावेशक, पारदर्शक आणि जबाबदार ऊर्जा वापराची क्षमता असलेली सरासरी तांत्रिक आणि वाणिज्य गळती कमी करण्याची मोहीम भारताने हाती घेतली असून स्मार्ट मीटर या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी बाजारपेठेत आमूलाग्र बदल घडवून देशभरात याचा वापर वाढवण्याच्या आमच्या प्रयत्नंना अधिक व्यापक करण्यासाठी एनआयआयएफसारख्या प्रस्थापित आणि अनुभवी संस्थेची साथ लाभ लाभणे ही अभिमानाची बाब आहे. या संयुक्त उपक्रमामुळे ‘उदय’ आणि ‘नॅशनल स्मार्ट ग्रिड मिशन’सारख्या महत्त्वाकांक्षी सरकारी योजनांच्या लक्ष्यसिद्धीला बळ मिळेल.

एनआयआयएफचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुजॉय बोस म्हणाले, भारतीय वीज क्षेत्र आपल्या ग्राहकांना २४ तास अव्याहत विश्वासार्ह वीज सेवा पुरवण्यासाठी प्रयत्नशील असताना वितरण कंपन्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन त्यांना लक्षणीय वाणिज्य फायदे मिळण्याबरोबरच ग्राहकांना वीज वापरासंबंधी योग्य निर्णय घेण्यासाठी अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने इंटेलिस्मार्ट अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल. सर्व भागधारकांबरोबर मजबूत बंध निर्माण करून त्या माध्यमातून व्यापक प्रमाणावर कार्यरत राहून विजेचा कार्यक्षम वापर करण्याबाबत क्षमता सिद्ध केलेल्या ईईएसएलसमवेत भागिदारी करताना आम्हाला आनंद होत आहे.