मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील ईईएसएल अर्थात एनर्जी एफिशिएन्सी सव्‍‌र्हिसेस लिमिटेडचा ऊर्जा बचत मानांकन असलेल्या विद्युत उपकरणांमध्ये आता वातानुकूलन यंत्र, स्वयंपाकाच्या स्टोव्हचाही समावेश होत असून ही उपकरणे आता मुंबईतही उपलब्ध होत आहे.

कंपनीने नुकतेच २० ते ३० टक्के ऊर्जा बचत करणारे व्होल्टास बनावटीचे वातानुकूलित यंत्र दिल्लीत सादर केले. ऊर्जा मानांकन असलेल्या आतापर्यंत १०,००० वातानुकूलन यंत्रांसाठी मागणी नोंदवली असून ही संख्या येत्या सहा महिन्यांत ५०,००० वर जाईल, असा विश्वास आतापर्यंत ईईएसएलचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ कुमार यांनी बुधवारी मुंबईत व्यक्त केला. यासाठी १९० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असल्याची त्यांनी माहिती दिली.

५०,००० वातानुकूलित यंत्रांच्या वापरामुळे प्रति वर्षी १४.५५ कोटी किलोवॉट प्रति तास विजेची (प्रति वर्ष १२० कोटी रुपये) बचत होईल, असा अंदाज आहे. यामुळे दरवर्षी वातावरणातील १.२० लाख टन कार्बन डायऑक्साइड वायू कमी होईल.

ऊर्जा कार्यक्षमतेचे मानांकन असलेले १.५ टन इन्व्हर्टर स्प्लिट वातानुकूलन यंत्र एक वर्षांच्या वॉरंटीसह ४१,३०० रुपये (वस्तू व सेवा करासह) किमतीत उपलब्ध करून देण्यात आले आहे. पुढच्या टप्प्यात ते बंगळूरु, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई आणि जयपूर या शहरांमध्ये विक्रीसाठी असेल. सध्या बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या बीईई पाच तारांकित वातानुकूलित यंत्रांपेक्षा २० टक्के अधिक किफायतशीर आणि बीईई तीन तारांकित एसींपेक्षा ५० टक्के अधिक किफायतशीर ही उपकरणे असल्याचा दावा या वेळी करण्यात आला.