कृषी वस्तू विनिमय बाजारात खरेदीदार आणि विक्रेता यांना वायदा बाजारातील हेजिंगचा (भावात लक्षणीयरीत्या चढ-उतारांपासून बचावाचा) फायदा, तर त्याच वेळी माहीतगार व विश्वासातील व्यक्तीबरोबर निश्चित किमतीवर रोकड सौदा असे स्पॉट आणि फ्युचर्स या दोन्हींच्या चांगल्या गुणांचे एकत्रीकरण करून लाभ देणाऱ्या एनसीडीईएक्सच्या ‘एक्स्चेंज ऑफ फ्युचर्स फॉर फिजिकल’ अर्थात ईएफपी व्यवहार सुविधेला उत्तरोत्तर चांगला प्रतिसाद दिसून येत आहे.
देशात कृषी जिनसांमध्ये ईएफपीची सुविधा सर्वप्रथम एनसीडीईएक्स या बाजार मंचाने सुरू केली. हा एक गैर-स्पर्धात्मक, बाजारबाह्य़ व्यवहार असल्याचे एनसीडीईएक्सचे मुख्य व्यवसाय अधिकारी विजय कुमार यांनी सांगितले. हे ईएफपी व्यवहार जरी एक्स्चेंजमधून होत असले तरी प्रतिपक्षांना व्यापाराच्या अटीनुसार निपटाऱ्याची (सेटलमेंटची) किंमत, गुणवत्ता, वितरणाची तारीख आणि ठिकाण वगैरे त्यांच्या आवश्यकतेनुसार ठरविण्याची वायदा अनुबंधाच्या तुलनेत लवचीकता मिळते. शिवाय ईएफपी व्यवहार भावात घसरणीमुळे होणारे नुकसान टाळण्यास मदत करतात. त्यामुळे प्रामुख्याने मिलर्स, प्रक्रियादार, व्यापारी यांच्याकडून या व्यवहारपद्धतीला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असल्याचे विजयकुमार यांनी सांगितले.
एकाचे पतन दुसऱ्यास मात्र लाभकारक
वस्तुत: घोटाळेग्रस्त नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लि. (एनएसईएल)ने वायदा आणि रोकड (स्पॉट) बाजार यांच्यातील नियमबाह्य़ युतीने गैरव्यवहारांना प्रोत्साहन देऊन पतन ओढवून घेतले. पण ही एकत्रीकरण केलेली व्यवहार पद्धती ‘एनसीडीईएक्स’ या बाजारमंचासाठी मात्र उपकारक ठरली आहे. ही बाजारबाह्य़ व्यवहार पद्धती असल्याने ईएफपीच्या बाबतीत एनसीडीईएक्सची एक्स्चेंज म्हणून भूमिका मात्र काटेकोरपणे आखली गेली आहे. ईएफपी व्यवहाराची मंजुरी आणि अंमलबजावणी एक्स्चेंजद्वारे पाहिली जाते. तथापि व्यवहाराच्या पूर्ततेची (सेटलमेंट) जबाबदारी, जोखीम, वितरण (डिलिव्हरी) ही जबाबदारी प्रतिपक्षांची असते. अर्थात माहीतगार व्यापारी आपापला गट बनवून परस्पर विश्वासाने व संमतीने समोरासमोर वायदा स्थितीची (पोझिशन्स) अदलाबदल करीत असल्याने प्रतिपक्षाकडून निपटाऱ्यात दगाफटक्याची शक्यता नगण्यच असते.