भांडवली बाजारात सलग पाच दिवस सुरू राहिलेल्या घसरणीतून, गुंतवणूकदारांना तब्बल आठ लाख कोटी रुपयांच्या कमाईवर पाणी सोडावे लागले आहे. गुरुवारी मुंबई शेअर बाजारात चढ-उताराच्या अस्थिरतेत विक्रीवालेच वरचढ ठरले आणि परिणामी मुख्य निर्देशांक सेन्सेक्स आणखी ५८५.१० अंश (१.१७ टक्के) घरंगळून, दिवसअखेर ४९,२१६.५२ वर स्थिरावला.

सेन्सेक्समधील सलग पाचव्या दिवशी झालेली ही घसरण असून, तिचे एकत्रित प्रमाण २,०६२.९९ अंश म्हणजे जवळपास ४ टक्के इतके आहे. मुंबई शेअर बाजाराचे बाजार भांडवल या घसरणीमुळे पाच दिवसांत ८,०४,२१६.७१ कोटी रुपयांनी रोडावले आहे.

देशातील बहुतांश राज्यांमध्ये करोना प्रादुर्भावाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे, त्याचप्रमाणे जगभरातील भांडवली बाजारांनी अमेरिकेची मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्र्हच्या धोरणाबाबत सावधगिरीची दाखविलेली भूमिका याच्या परिणामी आपल्या बाजारातही नरमाईचे वातावरण दिसले आहे. गुरुवारच्या व्यवहारात निफ्टीने १६३.४५ अंश (१.११ टक्के) गमावून दिवसाची अखेर १४,५५७.८५ या पातळीवर केली. मागील सलग पाच दिवसांत निफ्टीने ६१६.९५ अंशांचे नुकसान सोसले आहे. गुरुवारच्या व्यवहारात माहिती-तंत्रज्ञान समभागांना नफावसुलीमुळे विक्रीचा फटका सोसावा लागला.