News Flash

सेवा कराच्या जाळ्यात ८ लाख करदात्यांची भर

व्याज व दंडाची रक्कम माफ करून विशेष मोहिमेंतर्गत अद्याप कर जमा न केलेल्या तब्बल ८ लाख सेवा करदात्यांना डिसेंबरअखेर जाळ्यात आणण्याचे उद्दिष्ट अर्थमंत्र्यांनी गुरुवारी मुंबईच्या

| November 15, 2013 02:55 am

व्याज व दंडाची रक्कम माफ करून विशेष मोहिमेंतर्गत अद्याप कर जमा न केलेल्या तब्बल ८ लाख सेवा करदात्यांना डिसेंबरअखेर जाळ्यात आणण्याचे उद्दिष्ट अर्थमंत्र्यांनी गुरुवारी मुंबईच्या दौऱ्यात जाहीर केले. एकूण १२ ते १५ लाख करदाते अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत या विशेष मोहिमेंतर्गत सहभाग नोंदवतील, असा विश्वासही पी. चिदम्बरम यांनी व्यक्त केला.
सेवा करासाठी देशभरात १७ लाख करदात्यांनी नोंदणी केलेली आहे. मात्र आतापर्यंत त्यांपैकी केवळ ७ लाख करदात्यांनीच सेवा कर भरला आहे. अधिकाधिक करदात्यांनी हा कर भरावा म्हणून २०१३च्या अर्थसंकल्पात विशेष उल्लेख करण्यात आला होता. यासाठी कर न भरणाऱ्यांना दंड, व्याज माफ करण्याची मोहिमही मे २०१३ मध्ये सुरू करण्यात आली होती. २००७ ते २०१३ दरम्यानचे करदायित्व असणाऱ्यांसाठी डिसेंबर २०१३ पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.
या मोहिमेच्या प्रसाराचा भाग म्हणून मुंबईत गुरुवारी आयोजित एका चर्चासत्रादरम्यान अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी उद्योजक, व्यापारी म्हणून तुम्ही एखाद्या सेवेचा लाभ घेत असाल तर कर भरणे बंधनकारक आहे, असे आवाहन या वेळी केले. एखादी व्यक्ती ज्याप्रमाणे पती, पिता वा मित्र म्हणून आपल्या कर्तव्याप्रती जागरूक असते त्याचप्रमाणे तिने करासाठीदेखील पुढाकार घ्यावा, असे नमूद करत अर्थमंत्र्यांनी कर न भरणाऱ्यांना पकडणे कठीण नाही; तेव्हा त्यांनी कारवाई टाळावी, असे आवाहन उपस्थितांना केले.
सरकार १२ ते १५ लाख सेवा करदात्यांमार्फत महसूल गोळा करेल, असा विश्वास व्यक्त करतानाच कदाचित अशी सवलत मोहीम आणखी १० ते १५ वर्षे येणार नाही, याची जाणीव त्यांनी उपस्थित करदात्यांना करून दिली. सेवा करासाठी नोंदणी आहे मात्र त्यांनी कर भरणे थांबविले आहे, अशा १.२० कोटी करदात्यांना या मोहिमेत आणण्याचा विचार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
३१ ऑक्टोबपर्यंत या मोहिमेंतर्गत ७०० करदात्यांनी २३० कोटींहून अधिक सेवा कर भरला आहे. सध्याच्या मोहिमेंतर्गत थकीत करावरील व्याज, दंड माफ करण्यात आला असून थकीतापैकी निम्मा कर ३१ डिसेंबपर्यंत भरण्याची मुभा दिली आहे.
मुंबईतील चार करबुडव्यांवर बडगा
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या आणि सरकारच्या तिजोरीत सिंहाचा वाटा राखणाऱ्या मुंबईत नुकतीच सेवा कर न भरणाऱ्या चार बडय़ा धेंडाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. या चार व्यक्तींकडून एकत्रित १२ कोटी रुपये वसूल करण्यात आले असून या व्यक्ती सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2013 2:55 am

Web Title: eight lakh taxpayers paid service tax
Next Stories
1 ‘फेड दिलाशा’ने द्विशतकी उसळी
2 आर्थिक अंधश्रद्धा आणि अर्थसाक्षरता!
3 बालकांमधील अर्थसाक्षरता जोखणाऱ्या राष्ट्रीय परीक्षेची ‘सेबी’कडून घोषणा
Just Now!
X