‘सेन्सेक्स’ची ३० महिन्यांच्या उच्चांकापासून माघार

गेले काही महिने सावरलेला रुपया पुन्हा    प्रति डॉलर ५५ च्या पातळीवर रोडावला आहे. महागाईदरातील नरमाईने शेअर बाजारात निर्माण केलेल्या चैतन्यालाही घसरत्या रुपयाची दृष्ट लागलेली दिसून आली.

गेल्या आठवडय़ात जवळपास ६०० अंशांच्या चैतन्यपूर्ण तेजीची जोड मिळविणाऱ्या भांडवली बाजाराने नव्या सप्ताहाला दिलेली २०,५०० नजीकची सलामी अल्पकालीन ठरली. तब्बल ३० महिन्यांनंतर या शिखराला गाठणाऱ्या मुंबई शेअर बाजारात दिवसअखेर नफा वसुली झाल्याने गेल्या चार-पाच सत्रातील तेजीलाही खीळ बसली. शिवाय ६२.१४ अंशांचे नुकसान सोसत सेन्सेक्स पहिल्या दिवसअखेर २०,२२३.९८ वर थांबला, तर दिवसभरात ६,२०० हा अनोखा टप्पा गाठणारा निफ्टीदेखील व्यवहाराखेर ३०.४० अंश घसरणीसह ६,१५६.९० वर स्थिरावला.
गेल्या आठवडय़ात चार सत्रात तेजीतील सातत्य दाखविणारा सेन्सेक्स शुक्रवारअखेर एकूण ५९५.४५ अंश वाढीमुळे जानेवारी २०११ नंतरच्या सर्वोच्च टप्प्यावर पोहोचला होता. नव्या सप्ताहाचा प्रारंभ करतानाही बाजारातील ही तेजी सोमवारी कायम होती. सकाळच्या सत्रातच सेन्सेक्स २०,४४३.६२ या वरच्या स्तरापर्यंत गेला, तर निफ्टीने ६,२०० हा गुंतवणूकदारांचा मानसिक स्तरही ओलांडला. दोन्ही निर्देशांक त्याच्या गेल्या ३० महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचले होते. दिवसअखेर मात्र दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी नकारात्मकता नोंदवितानाच सलग पाचव्या सत्रात तेजी नोंदवू दिली नाही. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६,२००चा टप्पा पार करत ११ नोव्हेंबर २०१० नंतर प्रथमच व्यवहारात थेट ६,२२९.४५ पर्यंत पोहोचला होता.
आजच्या व्यवहारात बाजारात गृहोपयोगी वस्तूनिर्मिती क्षेत्रातील समभागांमध्ये गुंतवणूकदारांना नफा वसुली केल्याने सेन्सेक्स दिवसअखेर किरकोळ घसरणीसह बंद झाला. १३ क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाहन व माहिती तंत्रज्ञान निर्देशांक वगळता इतर सर्व नकारात्मक स्थितीत नोंदले गेले. बँक, आरोग्यनिगा, ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील समभागांची जोरदार विक्री झाल्याने दिवसअखेर बाजार उणे स्थितीत राहिला.
भारती एअरटेल, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक, सिप्ला या आघाडीच्या कंपन्यांच्या समभागांमध्येही गुंतवणूकदारांकडून झालेल्या व्यवहारामार्फत नफेखोरी दिसली. सेन्सेक्समधील १८ समभागांचे मूल्य घसरले.

* रुपया प्रति डॉलर ५५ च्या तळात
डॉलरच्या तुलनेत रुपया हे भारतीय चलन सोमवारी ५५.११ पर्यंत घसरताना गेल्या पाच महिन्याच्या तळात रुतले. ‘स्टॅन्डर्ड अ‍ॅन्ड पूअर्स’ या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल सावध इशारा देतानाच पतमानांकन कमी करण्याबाबत दिलेल्या दट्टय़ाने  डॉलरची मागणी वाढून रुपयावरील ताण वाढला. शेअर बाजारात सोमवारी देशी-विदेशी गुंतवणूकदारांचा नफावसुलीचा दिसलेला कल रुपयाच्या विनिमयदर घसरण्याला कारणीभूत ठरला. आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी रुपया तब्बल २३ पैशांनी घसरत प्रति डॉलर ५५.११ पातळीपर्यंत रोडावला. भांडवली बाजारातील नफारूपी निर्गुतवणुकीसाठी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांसह, तेल आयातदारांकडूनही सोमवारी डॉलरची मागणी नोंदविली गेल्याचा परिणाम चलन बाजारावर सकाळपासून दिसत होता. परिणामी रुपया शुक्रवारच्या ५४.८८ च्या तुलनेत दिवसाच्या सुरुवातीला ५५.०६ पर्यंत घसरला. सत्रात त्याने ५४.८० हा वरचा स्तर गाठला जरूर पण तो अल्पजीवी ठरला. रुपया त्यानंतर पुन्हा प्रति डॉलर ५५.२० पर्यंत खाली आला. अखेर शुक्रवारच्या तुलनेत २३ पैशांचे नुकसान सोसत ५५.११ वर बंद होताना, रुपयाने ७ जानेवारी २०१३ नंतरचा सर्वात खालचा स्तर गाठला. जानेवारीत रुपयाची ५५.२३ पर्यंत घसरण झाली होती.

सकाळच्या सत्रात १४४.४४ अंश वाढीमुळे जून २००८ नंतरच्या सर्वोत्तम टप्प्याला पोहोचणारा सेन्सेक्स दिवसभर तेजीत होता. अमेरिकेतील गृह विक्रीचे जाहीर होणारे आकडे आणि येत्या बुधवारी फेडरल रिझव्‍‌र्हचे अध्यक्ष बेन बर्नान्के हे काँग्रेसच्या अर्थविषयक संयुक्त समितीपुढे अमेरिकेच्या अर्थस्थितीबाबत सादरीकरण करणार असल्याने स्थानिक गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने दिवसअखेर बाजारात नफेखोरीचे धोरण अवलंबिलेले दिसले.
– प्रतीक सुधीर जोशी, बाजार विश्लेषक

जागतिक भांडवली बाजारातील तेजीपोटी देशातील शेअर बाजारांमध्ये सुरुवातीला मोठी वाढ पाहायला मिळाली. परिणामी बाजार त्याच्या नजीकच्या उच्चांकावर पोहोचला. मात्र गुंतवणूकदारांच्या नफेखोरीमुळेच महिंद्र, बजाज, मारुतीसारख्या वाहन क्षेत्रातील समभागांचे मूल्य दोन टक्क्यांपर्यंत रोडावले. तर आरोग्यनिगा, ग्राहकोपयोगी वस्तू हे क्षेत्रीय निर्देशांकही एक टक्क्यांपर्यंत घसरले.
– निधी सारस्वत, वरिष्ठ विश्लेषक, बोनान्झा पोर्टफोलियो

* सोने तोळ्यामागे २६ हजारांखाली
मौल्यवान धातू सोने – चांदीचे दर कमालीचे कमी होत आहेत. सोमवारी शहरात तोळ्यासाठी सोन्याचे दर २६ हजार रुपयांखाली तर प्रति किलोचा चांदीचा भाव ४३ हजारांखाली घरंगळलेला आहे. महिन्याभरात सोने-चांदीचे भाव मोठय़ा प्रमाणात खालच्या टप्प्यावर आले आहेत. एमसीएक्स या वायदे बाजारावरही सोन्याचा भाव सोमवारच्या सत्रात रु. २५,५०० च्याही खाली उतरलेला पहायला मिळाला. १८ एप्रिलनंतरची ही सोन्याच्या भावाने दाखविलेली ही सर्वात निम्न पातळी आहे. दरम्यान, राजधानी दिल्लीतही सोने १० ग्रॅमसाठी २६ हजारांवर येताना गेल्या २१ महिन्याच्या नीचांकावर आले. तर चांदीचा भावही ४३ हजार रुपयांखाली स्थिरावताना ३१ महिन्यानंतर प्रथमच या पातळीवर आला. तोळ्यामागे सोने दरातील घसरण ३५० रुपयांपर्यंतची चांदीची दरांची नरमाई किलोमागे दीड हजार रुपयांची होती.