देशाच्या सार्वभौम पतमानांकनाला सर्वात मोठा धोका हा निवडणुकानंतर छोटय़ा पक्षांनी एकत्र येऊन बनविलेले कडबोळं सरकार ठरेल, असा इशारा आंतरराष्ट्रीय मानांकन संस्था ‘मूडी’ने गुरुवारी दिला. बहुतांश मतदान पूर्व चाचण्यांनी मोदीप्रणीत भाजप सरकारचा निर्वाळा दिला असल्याकडे निर्देश करीत ‘मूडी’ने गेल्या दोन दशकांत या चाचण्यांचे अंदाज आणि प्रत्यक्ष निकाल यात तफावत राहिल्याचे स्पष्ट केले. मात्र यंदाच तसेच घडल्यास, देशात गुंतविले गेलेले विदेशी भांडवल माघारी जाईल, जे रुपयाला कमजोर बनवेल. परिणामी आर्थिक उभारी आणि वित्तीय सक्षमीकरण अवघड बनेल, असा मूडीचा कयास आहे.