‘महिंद्रा रेवा’ या कंपनीतर्फे ‘महिंद्रा ई२ओ’ ही चार माणसे बसू शकतील अशी इलेक्ट्रिक मोटार सादर करण्यात आली. शहरांतील रस्त्यांसाठी बनविली गेलेली ही मोटार प्रतिमहिना सुमारे सहाशे रुपयांच्या चार्जिगनंतर एक हजार किलोमीटर धावते. या मोटारीची पुण्यातील शोरूम किंमत ६ लाख ७० हजार रुपये आहे.
विशेष म्हणजे ही मोटार सौर ऊर्जेद्वारेही चार्ज करता येणार आहे. देशभरात कंपनीतर्फे एकूण २६३ ठिकाणी या मोटारींसाठी चार्जिग पोर्टस् उभारले आहेत. पुण्यातही कंपनी ८ चार्जिग पोर्टस् उभारत असून त्यासाठी मगरपट्टा, हिंजवडी असे आयटी कंपन्यांच्या जवळचे भाग आणि शॉपिंग मॉल्सचा विचार होत आहे. ‘महिंद्रा रेवा’च्या ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख आर. चंद्रमौळी आणि जनसंपर्क प्रमुख पवन सचदेव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. २०१४ सालापासून या मोटारींची युरोपला निर्यातही करण्यात येणार आहे.
ही मोटार खूप लांबच्या पल्ल्यांसाठी नसून प्रामुख्याने शहरात चालविण्यासाठी बनविण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले. पाच तासांच्या चार्जिगवर ही मोटार १०० किलोमीटर पळते. त्यामुळे प्रतिमहिना या मोटारीच्या चार्जिगवर सुमारे सहाशे रुपयांचा खर्च होतो. वजनाने हलकी आणि जास्त दिवस चालणारी लिथियम आयन बॅटरी, कमी परिघातही मोटार सहज वळवता येणे, स्मार्टफोनवरील विशिष्ट अॅप्लिकेशनद्वारे मोटारीतील काही गोष्टींवर दुरून नियंत्रण ठेवता येणे ही ‘ई२ओ’ची वैशिष्टय़े असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले.