पाश्चत्य राष्ट्रांमध्ये मात्र प्रमाण किमान पाच टक्के

पाश्चात्य राष्ट्रांमध्ये पाणीपुरवठा योजनांसाठी वीज वापरावरील खर्च किमान पाच ते कमाल ३० टक्के असताना, भारतात हेच प्रमाण ४० टक्क्य़ांपेक्षा जास्त आहे. त्यातच भारतात सिंचनाचे पाणी वाहून नेताना त्यातील एक तृतीयांश पाणी वाया जाते.

पाणीपुरवठा आणि पाणी वापराच्या क्षेत्रात सुधारणा करण्यावर डेन्मार्कमध्ये मुख्यालय असलेल्या ‘ग्रंडफॉस’ कंपनीने भर दिला आहे.  पंप निर्मितीत आघाडीवर असलेल्या या कंपनीची ५६ राष्ट्रांमध्ये कार्यालये आणि ८० पेक्षा जास्त देशांमध्ये अस्तित्व आहे.

चेन्नईमध्ये पंप निर्मितीचा कारखाना असलेल्या कंपनीने भारतातील पाणीपुरववठा क्षेत्रात कशा प्रकारे सुधारणा करता येईल याचाही अभ्यास सुरू केला आहे. यासाठी ६० पेक्षा जास्त तंत्रज्ञानांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पाणीपुरवठय़ाबाबत जागतिक बँक आणि संयुक्त राष्ट्राच्या अहवालांच्या आधारे तुलनात्मक अभ्यास करण्यात आला आहे. पाश्चात्य राष्ट्रांमध्ये पाणीपुरवठा योजनेकरिता विजेवरील खर्च पाच ते ३० टक्के एवढा आहे. बहुतांशी पाश्चात्य राष्ट्रांमध्ये हा १० टक्क्य़ांच्या आसपासच आहे. अमेरिकेत  काही ठिकाणी तर पाच टक्क्य़ांपेक्षा कमी आहे. भारत आणि बांगलादेश या दोन विकसनीशल देशांमध्ये हाच खर्च ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्याची माहिती ‘ग्रंडफॉस’चे पाणी वापर विभागाचे जागतिक संचालक मॉर्टन रिल्स यांनी दिली. या खर्चापैकी ८० टक्के खर्च हा पंपांच्या वीज वापरावर होतो. पाश्चात्या राष्ट्रांप्रमाणेच भारतालाही हा खर्च कमी करावा लागेल, असे मत रिल्स यांनी व्यक्त केले.

लंडनमध्ये २५ टक्के पाणी वाया जाते..

पाणीपुरवठा करताना पाणी वाया जाण्याची समस्या सर्वच राष्ट्रांना भेडसावते. एका पाहणीत लंडन शहरातही पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेतील २५ टक्के पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती ‘ग्रंडफॉस’च्या वरिष्ठ संचालिका मॅरिन कंडसेन यांनी दिली.

भारतात सिंचनाचे एक तृतीयांश पाणी वाया जाते. भारतातील ही गळती रोखण्याकरिता डिजीटल पद्धतीचे नवीन पंप तयार करण्यात आले आहेत.

पाण्याची गळती रोखण्याकरिता ‘ग्रंडफॉस’ कंपनीने ड्रोन तयार केले आहेत. भारतासारख्या कृषीप्रधान राष्ट्रांमध्ये ही यंत्रणा लाभदायी ठरेल, असा कंपनीचा दावा आहे. पाण्याच्या प्रवाहाचे व्यवस्थापन करण्याकरिता सेन्सॉरवर आधारित यंत्रणा बसविल्यास पाणी वाया जात नाही. भारतासारख्या अनेक राष्ट्रांमध्ये पाण्याची समस्या जाणवते. दक्षिण अफ्रि केतील केपटाऊन शहरातील पाणी स्त्रोतच संपला आहे. भारतात बंगळुरू शहरातील पाण्याचा स्त्रोत मरणपंथाला लागल्याचे या क्षेत्रातील जाणकरांचे म्हणणे आहे.

२०३० मध्ये जागतिक पातळीवर उपलब्ध पाणी आणि मागणी यात ४० टक्क्य़ांचे अंतर असेल, असा अंदाज कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आस्क निलसन यांनी व्यक्त केला. पाण्याच्या क्षेत्रात सुधारणा करण्याकरिता ‘ग्रंडफॉस’च्या मुख्यालयात विविध प्रयोग करण्यात येत आहे. या दृष्टीने आवश्यक अशी यंत्रणा पंपांमध्ये बसविण्याची योजना असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्या  डॉरेट मॅच यांनी यावेळी सांगितले.