News Flash

म्युच्युअल फंडात दीर्घावधीच्या मुदतबंद ‘ईएलएसएस’ योजनांचे पर्व

‘बीओआय अ‍ॅक्सा’ची नवीन करबचत योजना

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

दीर्घावधीच्या सामान्यपणे तीन वर्षे कालावधीच्या ऐवजी १० वर्षे कालावधीच्या मुदतबंद समभागसंलग्न करबचत योजनांचे अर्थात ‘ईएलएसएस’चे सध्या म्युच्युअल फंड उद्योगात पर्व सुरू आहे. अशा दोन योजना सध्या गुंतवणुकीसाठी खुल्या झाल्या आहेत, तर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडांच्या अशा दोन योजना गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत.

प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत करबचतीसाठी ‘ईएलएसएस’ योजनांना करदात्यांकडून अलीकडे पसंती मिळू लागली आहे. तुलनेने सर्वात कमी काळ (तीन वर्षे) गुंतवणूक अडकून राहून, समभागांमध्ये गुंतवणुकीच्या संधीचे दालन आणि करबचतीसह चांगला परतावा मिळवून देणारा हा पर्याय ठरला आहे. प्रत्येक फंड घराण्याच्या ईएलएसएस योजना आहेत.

परंतु आता १० वर्षे मुदत बंद प्रकारातील ईएलएसएस हा नवीन गुंतवणुकीचा प्रकार खुला झाला आहे. करबचत हंगाम लक्षात घेता, ‘यूटीआय लाँग टर्म अ‍ॅडव्हान्टेज फंड’ आणि ‘बीओआय अ‍ॅक्सा मिडकॅप टॅक्स फंड – सीरिज १’ अशा १० वर्षे मुदतीच्या दोन योजना सध्या गुंतवणुकीसाठी खुल्या झाल्या आहेत.

दहा वर्षे मुदत बंद कालावधीच्या ईएलएसएस योजना निधी व्यवस्थापकाला मोठय़ा कालावधीसाठी गुंतवणूक निर्णय घेण्याची मुभा प्रदान करतात. बाजारपेठेतील बिगर-अन्वेषित विभागातील काही चांगले मूल्य असलेल्या सुप्त हिऱ्यांना शोधून निधी व्यवस्थापकांना या समभागांबाबत दीर्घावधीचा दृष्टिकोन राखता येईल. दीर्घावधीत गुंतवणूकदारांसाठी ही बाब लक्षणीय परताव्याच्या दृष्टीने आकर्षक ठरेल, असे मुंबईस्थित वित्तीय सल्लागाराने मत व्यक्त केले.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाकडून ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाँग-टर्म वेल्थ एन्हासमेंट फंड’ हा १० वर्षे मुदतबंद ईएलएसएस योजनेत पर्याय उपलब्ध झाला आहे. या शिवाय गत आठ वर्षांपासून या फंड घराण्याची ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल आर.आय.जी.एच.टी.’ अशी करबचतीची योजना कार्यरत आहे. सप्टेंबर २००९ पासून या फंडाची गंगाजळी ४.३७ पटीने फुगली आहे. तर त्याने या काळात वार्षिक सरासरी २० टक्के दराने दिलेला परतावा तुलनेने खूपच लक्षणीय आहे.

‘बीओआय अ‍ॅक्सा’ची नवीन करबचत योजना

बँक ऑफ इंडिया अ‍ॅक्सा म्युच्युअल फंडाने ‘बीओआय अ‍ॅक्सा मिडकॅप टॅक्स फंड – सीरिज १’ ही १० वर्षे मुदतबंद प्रकारातील ‘कलम ८० सी’नुसार गुंतवणूकदारांची करबचत करणारी योजना प्रारंभिक गुंतवणुकीसाठी खुली केली आहे. या फंड घराण्याचे मुख्य गुंतवणूक अधिकारी आलोक सिंग हेच या योजनेचे निधी व्यवस्थापक आहेत. सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, नावाप्रमाणेच ही योजना प्रामुख्याने बाजार भांडवलाप्रमाणे १०१ ते २५० अशा क्रमवारीत येणाऱ्या मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये किमान ६५ टक्क्य़ांपर्यंत गुंतवणूक करणार आहे. फंडातील ३५ टक्के गुंतवणूक ही अन्य समभाग आणि समभागसदृश पर्यायात केली जाईल आणि ३५ टक्क्य़ांपर्यंत गुंतवणूक ही रोखे पर्यायात करण्याचा पर्यायही निधी व्यवस्थापकाकडे असेल. धारणा कालावधी मोठा म्हणजे १० वर्षांचा असल्याने निधी व्यवस्थापकाला चांगला ‘अल्फा’ मिळविण्याला वाव राहणार आहे. ‘निफ्टी मिडकॅप १००’ हा या योजनेच्या संदर्भ निर्देशांक असेल. येत्या ९ फेब्रुवारीपर्यंत योजना गुंतवणुकीसाठी खुली असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 1, 2018 1:03 am

Web Title: elss mutual funds for tax saving
Next Stories
1 समभागांचे मूल्यांकन अर्थव्यवस्थेच्या वाढीशी अनुरूप हवे!
2 करदात्यांचा विस्तार, बचतीत वाढ
3 ‘नकोशा’ मुली  २ कोटी १० लाख
Just Now!
X