News Flash

इएलएसएस : कर बचत आणि संपत्ती निर्माती योजना

इएलएसएसमध्ये फंडात केलेल्या गुंतवणुकीमुळे कर बचत, अस्थिरता व्यवस्थापन आणि संपत्ती निर्मिती हे फायदे होतात

भूषण केदार

अनेक व्यक्तींसाठी कर नियोजन ही गोष्ट वर्षभर करावयाच्या नियमित व्यायामाऐवजी आर्थिक वर्षांच्या शेवटी करावयाची एक औपचारिकता ठरते. परिणामी कर नियोजन हे गरजेनुसार करावयाची गोष्ट न राहता त्या क्षणी जे उपलब्ध आहे त्या करवजावट साधनाचा वापर केला जातो. परंतु पारंपारिक निश्चित उत्पन्नाच्या मार्गाने सुरक्षा आणि स्थिरतेचे वचन दिले गेले तरी या गुंतवणूक साधनांवर मिळणारा वास्तविक आणि चलनवाढ -समायोजित परतावा केवळ करबचतीचे साधन ठरते.

या व्यतिरिक्त त्या व्यक्तीच्या संपत्ती – निर्मितीसारख्या गरजा भागविण्यास असमर्थ ठरते. म्हणूनच, पारंपारिक निश्चित उत्पन्न देणाऱ्या करबचत साधनांपेक्षा समभाग संलग्न कर – बचत (इएलएसएस) साधनांची निवड, दीर्घकालीन कालावधीत गुंतवणुकीबरोबर संपत्ती निर्मिती करत असल्याने या गुंतवणुकीचा करबचत आणि संपत्ती निर्मिती असा दुहेरी फायदा होतो.

अर्थशिक्षित करदात्यांमध्ये वेगाने लोकप्रियता मिळविणारी करबचत उत्पादनांची एक शैली म्हणजे म्युच्युअल फंडांद्वारे उपलब्ध असलेली इक्विटीटी-लिंक्ड सेव्हिंग स्कीम (इएलएसएस) होय. हे साधन प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० (सी) अंतर्गत एकाच वेळी कर बचत करतांना वैयक्तिक करदात्यांना समभाग संलग्न गुंतवणूक करण्याची उत्तम संधी उपलब्ध करून देतात.

इएलएसएस हा असा फंड प्रकार आहे ज्यात गुंतवणूक केल्यास करदाता त्याला त्याच्या करदायित्वातून सूट मिळते. या फंडाचे निधी व्यवस्थापक फंड निधी बाजारातील उपलब्ध लार्ज मिड स्मॉल प्रकारच्या आणि वेगवेगळ्या संकल्पांनी युक्त अशा समभाग प्रकारात गुंतवणूक करतात. या फंडात किमान तीन वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. इएलएसएसमध्ये गुंतवणुकीच्या रकमेवर कमाल मर्यादा असली तरी प्राप्तिकराच्या कलम ८० (सी) अंतर्गत एका आर्थिक वर्षांत दीड लाखापर्यंतच वजावट मिळते. इएलएसएसमधील दीड लाख रुपयांच्या गुंतवणुकीसाठी उपकर वगळता मिळणारी कर वजावट  १०%, २०% आणि ३० टक्के करकक्षेत असणाऱ्या करदात्यांसाठी अनुक्रमे १५ हजार, ३० हजार आणि ४५ हजाराची कर वजावट मिळते.

इएलएसएस फंड गटात कर वजावटीसाठी गुंतवणूक करण्याचे कारण प्राप्तिकराच्या कलम ८० (सी) अंतर्गत मिळणाऱ्या कर वजावटीसाठी उपलब्ध विकल्पांपैकी केवळ इएलएसएस हा शुद्ध समभाग असणार विकल्प आहे. त्या खालोखाल युलिप हा समभाग गुंतवणूक असलेला एक विकल्प असला तरी त्यासोबत अनिवार्य असलेला विमा गुंतवणूकदाराला घ्यावा लागतो. युलिप प्रकारात समभाग आणि विमा या प्रमाणे विमा आणि रोखे हा पर्यायदेखील गुंतवणूकदार स्वीकारू शकतात. भारताच्या लोकसंख्येच्या रचनेमुळे समभाग गुंतवणूक उभरत्या अर्थव्यवस्थेत सर्वात लाभदायक पर्याय आहे. तरुण गुंतवणूकदारांकडे (कमावते असल्याने) दीर्घकालीन गुंतवणुकीची विस्तृत क्षितिजे आहेत ज्यात समभाग गुंतवणूक अल्पावधीत धोकादायक असू शकली तरी दीर्घकाळात समभाग गुंतवणूक सर्वात लाभदायक असलेला मालमत्ता प्रकार आहे. वाढत्या कालावाधीनुसार गुंतवणुकीवरील परतावा वाढतो.

प्राप्तिकराच्या कलम ८०(सी) अंतर्गत करवजावट प्राप्त गुंतवणूक साधनांपैकी इएलएसएस फंडाचा अनिवार्य कार्यकाळ सर्वात कमी आहे. तीन वर्षांंच्या अनिवार्य कालावधीसाठी इएलएसएस फंडात केलेली गुंतवणूक नफा मिळवून देणारी नसली तरी दीर्घकालीन कालावधीत गुंतवणुकीतील जोखीम कमी होते. याची पुष्टी करण्यासाठी क्रिसिलने इएलएसएस फंडांच्या दैनंदिन कामगिरीचे २५ फेब्रुवारी २०२० पर्यंतच्या तीन, पाच, सात आणि दहा वर्षांच्या चलत सरासरीवर आधारावर विश्लेषण केले.  इएलएसएस फंडांची सरासरी कामगिरी एका लहान टप्प्यात (१७ ते २२ टक्के) आहे. परंतु विश्लेषण असेही सांगते की, तीन वर्षांची चलत सरासारी (११) टक्के असली तरी गुंतवणुकीचा वाढत्या कालावधीनुसार सुधारत जाते. दहा वर्षांची चलत सरासरी १९ टक्के आहे. गुंतवणुकीतील अस्थिरता मोजण्याचे प्रामाणिक विचलन (स्टँर्डड डेव्हीएशन) हे साधन असून तीन वर्षांच्या कालावधीत अस्थिरता १९ टक्के तर दहा वर्षांच्या कालावधीत अस्थिरता ६ टक्केपर्यंत कमी होते.

इएलएसएसमध्ये फंडात केलेल्या गुंतवणुकीमुळे कर बचत, अस्थिरता व्यवस्थापन आणि संपत्ती निर्मिती हे फायदे होतात. यामध्ये तीन वर्षे ‘लॉक – इन’ कालावधी असल्याने एसआयपी हप्ते भरल्यापासून तीन वर्षांनंतर काढता येतात.

लेखक क्रिसिलच्या म्युच्युअल फंड आणि निश्चित उत्पन्न संशोधन विभागाचे संचालक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 4:10 am

Web Title: elss tax savings and wealth creation plan zws 70
Next Stories
1 भांडवली बाजार आणखी तळात ; सेन्सेक्स, निफ्टीची तीन वर्षांतील मोठी पडझड
2 ‘एमटीएनएल’ची बँक ऑफ इंडियाकडून कर्जउचल!
3 येस बँकेला निर्बंधातून मुक्ती, खातेधारकांना ५० हजारापेक्षा जास्त रक्कम काढता येणार
Just Now!
X