सहा लाख रोजगारक्षमतेच्या चार प्रकल्पांसाठी राज्य सरकारशी सामंजस्य
मुंबई : संयुक्त अरब अमिरातस्थित एम्मार प्रॉपर्टीजची सहयोगी कंपनी ईगल हिल्स इन्व्हेस्टमेंट एलएलसीने मंगळवारी महाराष्ट्रात चार विशाल प्रकल्पांच्या स्थापित करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वाचा सामंजस्य करार केला. राज्यात विविध ठिकाणी ९,५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा कंपनीचा मानस असून, त्यातून तब्बल ६ लाख लोकांना थेट रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
ईगल हिल्सकडून राज्यात अन्न प्रक्रिया, फळे व भाज्या उत्पादन तसेच गोदाम सुविधा या क्षेत्रात चार विशाल प्रकल्प स्थापण्याचा मानस आहे. हाय टेक फूड सिटी, मेगा फूड सिटी, लॉजिस्टिक्स/ वेअरहाऊसिंग हब आणि फळे व भाज्या उत्पादनाचे केंद्र असे चार प्रकल्पांसंबंधी कंपनीचे नियोजन आहे. मंगळवारी मुंबईत या संबंधाने करण्यात आलेल्या सामंजस्य कराराप्रसंगी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह, उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगरानी, उद्योग सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांच्यासह एम्मार इंटरनॅशनलचे मुख्य कार्यकारी आणि एम्मार इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक हादी बद्री, यूएई-इंडिया फूड सिक्युरिटी प्रोजेक्टचे भारतातील प्रभारी गौरव वाधवा आणि त्याचे सल्लागार गोपाल शर्मा हे उपस्थित होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 4, 2019 1:01 am