शेठ कॉर्पबरोबर मुलुंड प्रकल्पात भागीदारी

बांधकाम क्षेत्रातील आघाडीच्या इमामी समूह आणि शेठ कॉर्प यांनी मॉंटाना या मुलुंडमधील पहिल्या प्रकल्पाची घोषणा केली आहे. पूर्व भारतात नावाजलेल्या इमामीचे बांधकाम क्षेत्रातील अंग असलेल्या ‘इमामी इन्फ्रास्ट्रक्चर’ तसेच आलिशान आणि मध्यम घरनिर्मितीतील शेठ कॉर्पबरोबर या गृह प्रकल्पासाठी प्रत्येकी ५० टक्के भागीदारी असेल.

प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वास्तुविशारद जेम्स लॉ यांनी या प्रकल्पासाठी रचनात्मक कौशल्य सादर केले आहे तर अंतर्गत आरेखनात जागतिक स्तरावर नावाजलेल्या एचबीए, सिंगापूरद्वारा सहकार्य लाभले आहे. तर बॅंकॉकमधील ट्रोप लॅंडस्केपडिझायनर प्रकल्पाला सौंदर्य प्राप्त करून देणार आहेत.

मुंबई उपनगरातील सात एकरीवरील शेठ आणि इमामीचा मॉंटाना प्रकल्प एलबीएस मार्गावर (पश्चिम) वसला आहे. यातील चार गृह मनोऱ्यांमध्ये विविध आकारातील २,३,४ आणि ५ बीएचके रचना असलेली घरे असतील.

इमामी व शेठ समूहाच्या वतीने आयोजित एका पत्रकार परिषदेत या प्रकल्पाबाबतची माहिती देण्यात आली. यावेळी शेठ ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अश्विन शेठ म्हणाले की, वसंत ऑस्कर आणि वसंत गार्डन प्रकल्पांद्वारे आधीपासूनच आमची मुलुंडमध्ये उपस्थिती आहे. नव्या प्रकल्पाच्या निमित्ताने होणारी इमामी समूह, जेम्स लॉ, एचबीए सिंगापूर आणि ट्रोप यांच्या बरोबरची भागीदारी दीर्घकालीन असेल.

इमामी समूहाचे संयुक्त अध्यक्ष आर. एस. अग्रवाल यांनी यावेळी सांगितले की, मॉंटाना हा शेठ कॉर्पबरोबरचा आमचा तिसरा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची बोलणी सर्वप्रथम २०१५ मध्ये झाली होती. मॉंटाना हा आमचा मुलुंडमधील पहिला प्रकल्प आहे.

एचडीएफसी अर्गोची ग्रामीण सेतू केंद्रांमार्फत सर्वाधिक विमा विक्री

ग्रामीण व निमशहरी भागात ५५ टक्के हिस्सा

मुंबई  : तिसऱ्या क्रमांकाची सामान्य विमा क्षेत्रातील खासगी कंपनी एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीने देशातील मुख्यत: ग्रामीण व निमशहरी भागातील सामान्य ई-सेवा (सीएससीज) अर्थात सेतू केंद्रांमार्फत विमा योजनांच्या विक्रीत ५५ टक्के हिश्श्यासह आघाडी मिळविली आहे. यामुळे एचडीएफसी अर्गो सेतू केंद्रामार्फत सर्वाधिक विक्री योगदान मिळविणारी कंपनी बनली आहे.

एचडीएफसी अर्गोने फेब्रुवारी २०१४ मध्ये या माध्यमातून उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये विमा विक्री सुरू केली. त्यानंतर महाराष्ट्र, पंजाब व मेघालय या राज्यांचा त्यात समावेश करण्यात आला.

ऑगस्ट २०१४ मध्ये सेतू केंद्रामार्फत कामकाज कंपनीने भारतभरात विस्तारले. आज या केंद्रातील अंदाजे दहा हजार सल्लागार एचडीएफसी अर्गोच्या उत्पादनांची शिफारस करतात.

एचडीएफसी अर्गोकडून मोटार थर्ड पार्टी लायबिलिटी विमा, किसान सेवा सुरक्षा कवच विमा (शेतकऱ्यांसाठी), वैयक्तिक अपघात विमा आणि स्टँडर्ड फायर अँड स्पेशल पेरिल्स विमा (फक्त ड्वेलिंग्ज) इत्यादींसाठी सेतू केंद्रामार्फत विमा विक्री केली जाते.

आज या माध्यमाद्वारे १,५०,००० विमा योजना वितरीत केल्या गेल्या आहेत. वितरित विमा योजना आणि एकूण विमा हप्ते या दोन्ही बाबतीत आपली कंपनी आघाडीवर आहे, असा एचडीएफसी अर्गोचे कार्यकारी संचालक अनुज त्यागी यांनी दावा केला.

आपल्या विमा योजनांच्या ग्रामीण भागात दूरवर वितरणासाठी हे उपयुक्त माध्यम ठरल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. देशातील सहा लाख गावांसाठी सुमारे एक लाख संगणक व इंटरनेट जोडणी असलेली सेतू केंद्रे सध्या कार्यरत आहेत.