सेबी अध्यक्ष सिन्हा यांचा विश्वास; सरकारच्या धोरणांची स्तुती

गेल्या आठवडय़ातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याची स्तुती करतानाच सरकारच्या गेल्या दोन वर्षांतील सरकारच्या धोरणामुळे अमेरिकेतील गुंतवणूकदार भारतीय अर्थव्यवस्थेविषयी आशावादी आहेत, अशी पावती सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी मंगळवारी येथे दिली.

मुंबईत आयोजित एका चर्चात्मक कार्यक्रमादरम्यान नुकतेच अमेरिका दौऱ्यावरून परतलेल्या सिन्हा यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत विदेशात उत्साही मत असल्याचे सांगितले. सिन्हा यांनी आपल्या विदेश दौऱ्यात म्युच्युअल फंड तसेच निवृत्तिवेतन फंडातील गुंतवणूकदारांची भेटही घेतली होती.

सिन्हा म्हणाले की, मोदी सरकारकडून गेल्या दोन वर्षांत अनेक धोरणे राबविली गेली आहेत. एकूणच भारताच्या बदलेल्या धोरणांबाबत विदेशातील गुंतवणूकदारांध्ये आता अधिक आशावादी चित्र आहे. येथील नियामक यंत्रणेमध्ये होत असलेल्या बदलाचेही अमेरिकेत स्वागत झाले आहेत.

सिन्हा यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांपेक्षा यंदाची देशातील अर्थस्थिती खूपच बदलली आहे. धोरणात्मक पातळीवर खूपच सकारात्मक बदल जाणवत आहे. भारतामार्फत कायदा, नियामक बदल याबाबत पडत असलेल्या पावलांचे अमेरिकेतील गुंतवणूकदारही स्वागत करत आहेत. दुहेरी करपद्धती (मॉरिशस) व पी-नोट्ससाख्या मुद्दय़ांवर भारताबद्दल आता अमेरिकेतील गुंतवणूकदारांच्या मनात किंतु नाही.