X

‘पीएफ’ लाभ अंशत: म्युच्युअल फंडाच्या युनिट्सच्या रूपात!

निवृत्तीपश्चात किमान दोन अंकी दराने परतावा देण्याचा प्रस्ताव

निवृत्तीपश्चात किमान दोन अंकी दराने परतावा देण्याचा प्रस्ताव

कामगारांच्या निवृत्तिवेतन निधीच्या व्यवस्थापक असलेल्या ‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना’ अर्थात ‘ईपीएफओ’ने आपल्या सदस्यांना निवृत्तीपश्चात लाभातील काही हिस्सा हा रोखीऐवजी म्युच्युअल फंडात गुंतविलेल्या युनिट्सच्या रूपात देण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी -ईपीएफचा पैसा भांडवली बाजारात गुंतविण्याला जितकी मुभा आहे  तितक्या प्रमाणातील मूल्याचे युनिट्स सेवानिवृत्तांना देण्याचे घाटत आहे. सध्या भांडवली बाजारात गुंतवणुकीस उपलब्ध निधीच्या १५ टक्के मर्यादेपर्यंत पीएफचा पैसा गुंतविण्याची मुभा असून, या मर्यादेतही वाढ प्रस्तावित आहे.

सध्या ईपीएफओकडून सदस्यांच्या वार्षिक वाढीव योगदानातून उभ्या राहणाऱ्या कोषातील १५ टक्के निधी भांडवली बाजारात गुंतविला जातो. हा निधी थेट न गुंतविता तो म्युच्युअल फंडाच्या एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) मार्फत गुंतविला जातो. उर्वरित ८५ टक्के निधी हा सुरक्षित सरकारी कर्जरोख्यांमध्ये गुंतविला जातो.

तथापि सेवानिवृत्तीपश्चात पीएफधारकांना त्या त्या वर्षांरंभी केंद्रीय विश्वस्त मंडळाकडून निर्धारित केल्या जाणाऱ्या व्याज दराप्रमाणे लाभ संचयित स्वरूपात दिला जातो. मात्र नव्याने पुढे आणलेला प्रस्ताव संमत झाल्यास, पीएफधारकांना निवृत्तीपश्चात लाभातील काही हिस्सा हा ईटीएफच्या युनिट्सच्या रूपात मिळेल. हे युनिट्स विकून या गुंतवणुकीतून पीएफधारक त्याच्या सोयीनुसार केव्हाही बाहेर पडू शकेल. भांडवली गुंतवणुकीतून मिळविलेला अधिकचा परताव्याचा लाभही ईपीएफओ आपल्या सर्व साडेचार कोटी सदस्यांमध्ये समान रूपात वितरीत करू इच्छित आहे, असा या प्रस्तावामागे उद्देश असल्याचे भविष्य निधी संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सेवानिवृत्तांना यामुळे दुहेरी मार्गाने परतावा मिळविण्याची संधी मिळणार आहे.

केंद्रीय कामगार मंत्रालयाने या प्रस्तावाबाबत सकारात्मक दर्शविली असून, त्यासाठी अर्थमंत्रालय व केंद्रीय मंत्रिमंडळाची लवकरच मंजुरी घेतली जाणे अपेक्षित असल्याचे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

तौलनिक परतावा कामगिरी 

Outbrain