देशातील पाच कोटींहून अधिक भविष्यनिर्वाह निधी (पी.एफ.) खातेदारांना आता आपल्या खात्यातील जमा व शिल्लक ही केव्हाही, कुठूनही ऑनलाइन पाहता येईल. कर्मचारी भविष्य निधी संघटनेने अशा नवीन सुविधेला शुक्रवारपासून सुरुवात केली. केंद्रीय कामगारमंत्री सिसराम ओला यांच्या हस्ते या सुविधेचे येथे अनावरण झाले. या प्रसंगी कामगार व रोजगार राज्यमंत्री कोडिकुन्नील सुरेश आणि केंद्रीय भविष्य निधी आयुक्त के. के. जालान हेही उपस्थित होते.
आजवरच्या प्रथेनुसार, भविष्य निधी संघटनेकडून दरवर्षी ३० सप्टेंबपर्यंत त्या त्या वर्षांतील मार्चअखेपर्यंतची खात्यातील शिलकीचा तपशील पीएफधारकांना कळविणारी पावती दिली जात असे. आता मात्र विनाविलंब आणि पारदर्शीपणे कोणीही खातेदार आपल्या खात्याबाबत इंटरनेटच्या सहाय्याने माहिती मिळवू शकतो.
तथापि नव्या सुविधेनंतरही पीएफ खातेदारांना सध्या केवळ ३१ मार्च २०१३ पर्यंतची खात्यातील शिल्लक पाहता येईल. लवकरच खात्यांमध्ये तात्काळ अद्ययावतीकरणाची प्रक्रियाही राबविली जाईल, असे भविष्य निधी संघटनेने स्पष्ट केले आहे. तर येत्या काळात नोकरी बदलल्याने पीएफ खात्याचेही करावे लागणारे हस्तांतरणही ऑनलाइन पद्धतीने करता येईल, अशी सोयही केली जाणार आहे.
शिवाय सर्व प्रकारच्या दाव्यांच्या निवारणासाठी सध्या लागणारा ३० दिवसांचा कालावधी तीन दिवसांपर्यंत कमी होईल, असा जालान यांनी दावा केला.
रुपयाला लवकरच स्थिरता लाभेल : सी. रंगराजन
भारताच्या अर्थव्यवस्थेसमोर असलेले प्रश्न रुपयाच्या विनिमय दरात आजवर पूर्णपणे प्रतिबिंबीत होत आली आहेत. पण यापुढे रुपयाच्या घसरणीला कारण ठरतील असे आणखी प्रश्न शिल्लक दिसत नाहीत, या कारणाने रुपया मजबूतच होईल, असा आशावाद पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार सी. रंगराजन यांनी व्यक्त केला. मागील आठवडय़ात अर्थमंत्रालयाने रुपयाच्या विनिमय दराची आदर्श पातळी ही ५८-५९ च्या दरम्यान असायला हवी, असे विधान केले होते. त्या उलट जागतिक अर्थस्थितीच्या पाश्र्वभूमीवर रुपयाचा विनिमय दर ६२-६३ पेक्षा अधिक असता कामा नये, असे डॉ. रंगराजन यांनी सूचित केले. सिरियामधील अस्थिरतेवर लवकरच मार्ग निघेल आणि कच्च्या तेलाचे भाव उतरू लागतील. त्याचवेळी रुपयाही वधारण्यास सुरुवात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरकारने उचललेली पावले आणि रिझव्र्ह बँकेचे नवीन गव्हर्नर रघुराम राजन यांनी सूत्रे हाती घेतल्यावर रुपयाच्या विनिमय दरातील सुधारणा आश्वासक असल्याचे त्यांनी सांगितले.