राज्यातील मॉल सुरू करण्याची तातडीने परवानगी देण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी विनंती करतानाच महाराष्ट्रातील शॉपिंग सेंटर चालकांचे संघटन करणाऱ्या व्यासपीठाने त्वरित मॉल सुरू न झाल्यास ऑगस्टपासून कर्मचारी कपात सुरू होईल, असा इशारा दिला आहे.

राज्यभरात ७५ हून अधिक मॉल असून यातील ५० टक्के  मॉल हे मुंबई महानगर, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, डोंबिवली आदी भागांत आहेत. पुण्यात २० टक्क्यांहून अधिक मॉल असून राज्यात इतरत्र – अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, नागपूर आदी शहरांत अन्य मॉल आहेत.

शॉपिंग सेंटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एससीएआय) ने पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहून या क्षेत्रातील ५० लाख रोजगारांवर गदा येण्याची शक्यता वर्तवितानाच त्याचा पहिला टप्पा येत्या महिन्यात दिसून येईल, असे सूचित केले आहे.

एससीएआयने ठाकरे यांना मार्गदर्शक तत्त्वांची यादीही दिली आहे. या सर्व उपाययोजनांमुळे मॉलमध्ये गर्दी होणार नाही आणि कोणत्याही वेळेला ही एक सुरक्षित जागा असल्याची खातरजमा होईल, असा दावा करण्यात आला आहे.

पत्रात एससीएआयने नमूद केले आहे की, सर्व किरकोळ विक्रे त्यांकडील कित्येक लाखांचा माल आता खराब होऊ लागला आहे आणि आता हा माल लगेचच विकला गेला नाही तर त्याची किंमतच उरणार नाही. परिणामी यातून व्यावसायिकांना अधिक आर्थिक फटका बसेल.

शॉपिंग सेंटरसाठी महाराष्ट्र ही फार महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि मॉल सुरू  करण्यात अजून विलंब झाल्यास ती आमच्यासाठी मृत्यूची घंटा ठरेल. देशभरात एससीएआयच्या सदस्यांनी राबवलेल्या नियमांमुळे शॉपिंग मॉल ही सर्वाधिक सुरक्षित जागा असल्याचे ठाम मत बनत आहे. संपूर्ण सज्जता, सुरक्षा नियमांचे कडक पालन आणि गर्दीला हाताळण्याची क्षमता यामुळे मॉलची ही ओळख बनली आहे.

– अमिताभ तनेजा, अध्यक्ष, शॉपिंग सेंटर्स असोसिएशन ऑफ इंडिया.