12 July 2020

News Flash

उद्यमशील, उद्य‘मी’ : उद्योग सशक्त की उद्योजक!

आर्थिक सल्ला देणारी व्यक्ती प्रत्येक उद्योगाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे.

मकरंद जोशी makarandjoshi@mmjc.in

मागील एका लेखात (दिनांक ०८/१०/२०१९) आपण पहिले की कराच्या दृष्टिकोनाने उद्योग मोठा करण्यासाठी काय करायला पाहिजे. या लेखात आपण उद्योग करताना उद्योगजकाने कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजे हे पाहूया. गेल्या ३-४ वर्षांंपासून दिवाळखोरी कायदा लागू झाल्यापासून आजारी उद्योग दिवाळखोर घोषित होण्याचा सपाटा लागला आहे. एकेकाळी चांगला चाललेला उद्योग काही वर्षांत दिवाळखोर का होतो हे समजून घेतले पाहिजे आणि त्या चुका टाळून आपला उद्योग मजबूत कसा करता येईल हे पहिले पाहिजे.

श्रीमंत कोण उद्योग का उद्योजक?

असे पाहण्यात येते की, जेव्हा उद्योगापेक्षा उद्योजक जास्त श्रीमंत होतो तेव्हा उद्योग संकटात जाण्याची शक्यता निर्माण होते. उद्योजकाला उद्योगातून पैसा बाहेर काढून वैयक्तिक मालमत्ता निर्माण करण्याची खुमखुमी प्रमाणाबाहेर झाली तर उद्योगातील रोख रक्कम कमी होते आणि त्यातून उद्योग संकटात जाण्याची शक्यता वाढते. उद्योगातील नफा बाहेर काढताना उद्योजकाने सावधान राहावे आणि उद्योगाला हानी होणार नाही एवढाच नफा बाहेर काढावा. कित्येक वेळेस नफा किती झाला आहे हेच उद्योजकाला माहित नसते. यासाठी प्रत्येक महिन्याला ‘फायनान्शिअल स्टेटमेंट’ (Financial  Statement) बनवून घेणे अनिवार्य आहे. तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कर सल्लागार (Tax Advisor) कराबद्दल सल्ला देतात; परंतु आर्थिक विषयात सल्ला देणारी तज्ज्ञ व्यक्ती आवश्यक आहे. साधारणपणे मोठय़ा उद्योगात हे काम Chief Financial Officer (CFO) करतो तज्ज्ञ संस्थापक मंडळ (Board Of Director) देखील ही देखरेख ठेवतात. अशा प्रकारचा आर्थिक सल्ला देणारी व्यक्ती प्रत्येक उद्योगाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे.

उद्योजकाचे इतर आर्थिक हितसंबंध

उद्योजकाचे हितसंबंध असलेले इतर उद्योग प्रमुख उद्योगाच्या संकटाला कारण ठरणार नाहीत याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. कित्येक वेळेस उद्योजक नवनवीन कल्पनांवर अनुसरून नवीन उद्योग चालू करतात आणि त्याच्या भरण पोषणाची जबाबदारी दुसऱ्या उद्योगावर येते. ही जबाबदारी पार पाडताना तो उद्योगदेखील संकटात जातो. आजारी उद्योगाला वाचवताना चांगला चाललेला उद्योग संकटात जाणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. उद्योजकाचे उद्योगाकडे होत असलेल दुर्लक्ष उद्योग आजारी पडण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. शेतकरी ज्याप्रमाणे अहोरात्र शेताला जपतो त्याप्रमाणेच उद्योजकाला दिवसरात्र डोळ्यात तेल घालून उद्योग करावा लागतो. थोडाही दुर्लक्षपणा उद्योगाला खूप भारी पडू शकतो.

भांडवल आणि कर्जाचे प्रमाण

साधारणपणे ३०-३५ वर्षांंपूर्वी जमिनीची किंमत आजच्या इतकी अवाजवी नव्हती. त्यामुळे प्रत्येक तालुक्यांतील टकऊउ मध्ये उद्योग उभे राहू शकले. आज उद्योग उभारण्यासाठी लागणारी रक्कम खूप जास्त आहे. ही रक्कम फक्त कर्ज स्वरुपात उभी राहू शकत नाही. कर्जाचा बोजा स्वत: च्या भांडवलापेक्षा जास्त झाला तर उद्योग संकटात जाऊ  शकतो. भांडवल आणि कर्ज यांच परस्पराशी असलेले संबंध आणि त्याचे उद्योगावर होणारे परिणाम हा गुंतागुंतीचा विषय आहे आणि त्यांवर बारीक लक्ष असावे लागते. वरील गोष्टी व्यवस्थित हाताळल्या तर आपला उद्योग सुदृढ आणि सशक्त राहू शकेल आणि उद्योगात प्रगती करायला कमी अडचणींचा सामना करावा लागेल.

आर्थिक नियोजन आणि तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला

अनेक वेळेस असे दिसून आले आहे की, आर्थिक निर्णय भावनिक आधारावर घेतले जातात; याची प्रमुख कारणे म्हणजे :

१. आर्थिक ताळेबंद/माहिती संकलित आणि सुस्थितीत नसते. ज्या कंपन्या आपला ताळेबंद वर्ष संपल्यानंतर ६ महिन्यात देऊ  शकत नाहीत त्या कंपन्या आर्थिक निर्णय अंदाजे आणि भावनिक आधारावर घेण्याची शक्यता दाट असते.

२. सर्व सल्लागार ‘कर’ या विषयात व्यस्त असतील तर आर्थिक साक्षरता आणण्यासाठी आणि वाढवण्यासाठी नवीन सल्लागाराची नेमणूक करावी लागेल. योग्य सल्ला न मिळाल्यामुळे भावनिक निर्णय घेतले जातात आणि असे निर्णय उद्योगाला संकटात नेऊ  शकतात.

(लेखक कंपनी सचिव आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 12:25 am

Web Title: empowering entrepreneurs industry empowering entrepreneurs zws 70
Next Stories
1 महाराष्ट्रातील बँका आजही बंदच
2 कॉर्पोरेट करातील कपातीमुळे गुंतवणूक वाढेल, ‘आयएमएफ’ने केलं समर्थन
3 ‘सिटी को-ऑपरेटिव्ह’ घोटाळ्याप्रकरणी अध्यक्ष अडसूळ यांना अटक करावी
Just Now!
X