सक्तवसुली संचालनालयाच्या तपासातून उलगडा

एक्स्प्रेस वृत्त, मुंबई</strong>

सध्या रिझव्‍‌र्ह बँकेकडून नियुक्त प्रशासकाद्वारे कारभार सुरू असलेल्या दिवाण हाऊसिंग फायनान्स लि. (डीएचएफएल)ने २०११ ते २०१६ या दरम्यान जवळपास एक लाख बनावट ग्राहकांच्या नावे १२,७७३ कोटी रुपयांची कर्ज खाती उघडली आणि प्रत्यक्षात ही रक्कम प्रवर्तक वाधवान यांच्याशी संलग्न ७९ कंपन्यांकडे वळते केले, असे या प्रकरणी तपास करीत असलेल्या सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीला आढळून आले आहे.

तीन दिवसांपूर्वी कुख्यात तस्कर इक्बाल मेमन ऊर्फ इक्बाल मिरचीशी संबंधित तीन मालमत्ता खरेदी केल्याप्रकरणी ईडीने डीएचएफएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान यांना अटक केली आहे. यात २१०० कोटी रुपयांचा बेनामी व्यवहार उघड झाला आहे. याप्रकरणी सुरू करण्यात आलेल्या अतिरिक्त चौकशीत कथित बनावट कर्जदार ग्राहक आणि त्यांच्या अंतिम लाभार्थी कंपन्यांना दिल्या गेलेल्या घबाडाचाही उलगडा झाल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले.

डीएचएफएलने इक्बाल मिरचीशी निगडित वरळीस्थित मालमत्ता २२५ कोटी रुपयांत खरेदी करणाऱ्या सनब्लिंक रिअल इस्टेटला कर्ज दिले आहे. सनब्लिंकमध्ये सामावण्यात आलेल्या फेथ रिअ‍ॅल्टर्स, माव्‍‌र्हल टाऊनशिप, एबल रिअ‍ॅल्टी, पॉसेडॉन रिअ‍ॅल्टी आणि रँडम रिअ‍ॅल्टर्स या पाच कंपन्यांना डीएचएफएलने एकूण २,१८६ कोटी रुपयांचे कर्ज दिली आहेत.

तथापि या पाच कंपन्यांच्या कर्ज खाती धुंडाळली असता, वरील धक्कादायक माहिती पुढे आल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी अटक झालेले कपिल वाधवान हे पाचवे आरोपी असून, तेच कर्ज रकमेच्या अफरातफरीचे प्रमुख सूत्रधार असल्याचे सांगितले जाते.