‘लोकसत्ता एसएमई कॉन्क्लेव्ह’मध्ये सहभागी उद्योजकांच्या भावना

‘लोकसत्ता’ने उपलब्ध करून दिलेला लघू उद्योजकांवरील विचारमंथनाचा मंच हा नागपूरसह एकूणच विदर्भातील छोटय़ा उद्योग क्षेत्रासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरला, अशी प्रतिक्रिया परिषदेतील सहभागी उद्योजकांनी व्यक्त केली.

येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता एमएमई कॉन्क्लेव्ह – २०१९’मध्ये याबाबतचे मत व्यक्त करण्यात आले. सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि. प्रस्तुत ही परिषद उपराजधानीतील हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये ही परिषद पार पडली. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख व मुंबई शेअर बाजारच्या लघू व मध्यम उद्योग विभागाचे प्रमुख अजय ठाकूर, नागपूर विभागाचे उद्योग सहसंचालक अशोक धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या या एकदिवसीय परिषदेला मोठय़ा संख्येने उद्योजक व त्यांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

लघू व मध्यम उद्योगासाठी भांडवली बाजारातून भांडवल उभारणीबाबत अजय ठाकूर यांनी केलेले उद्बोधन उद्योजकांसाठी मार्गदर्शक ठरले. या कार्यक्रमात ‘बुटीबोरी मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन’चे अध्यक्ष नितीन लोणकर, ‘मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज असोसिएशन’ एमआयडीसी हिंगण्याचे अध्यक्ष कॅप्टन सी. एन. रणधीर, ‘विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन’चे अध्यक्ष अतुल पांडे, ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया इंडस्ट्रीज’चे विदर्भप्रमुख राहुल दीक्षित, ‘दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज’चे अध्यक्ष निश्चय शेळके आणि ‘विदर्भ इकानॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल’चे उपाध्यक्ष शिवकुमार राव यांनी या वेळी त्यांचे प्रश्न मांडले.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी उपस्थितांच्या सर्व प्रश्नांची नोंद घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन या वेळी दिले. तर काही समस्यांचे निरसन त्यांनी त्वरित केले.परिषदेला सारस्वत बँकेच्या क्षेत्रीय व्यवस्थापक रेणुका वाचासुंदर, ‘ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍स’चे (ओसीडब्ल्यू) मुख्य कार्यकारी अधिकारी  सुजॉय रॉय, ‘मँगो हॉलिडे’चे शाखा व्यवस्थापक अनंत दांडेकर या वेळी उपस्थित होते.