मकरंद जोशी

सिंग कुटुंबीय (रेलिगेअर, फोर्टिस), कुंवर कुटुंबीय (अपोलो टायर्स), किर्लोस्कर बंधू (किर्लोस्कर उद्योग), अंबानी कुटुंबीय (रिलायन्स उद्योग) या सगळ्या उद्योगांमध्ये काही साधर्म्य आहे.

अ) ही सर्व श्रीमंत उद्योग घराणी आहेत आणि ब) या सर्व घराण्यांतील कौटुंबिक कलह खूप गाजले आहेत.

जेव्हा उद्योग घराणे मोठे होते तेव्हा ते कायम प्रकाशझोतात असतात आणि त्यांच्या कौटुंबिक बाबीदेखील सार्वजनिक होतात. वरील नमूद उदाहरणांपैकी बहुतेक सर्वानी योग्य वेळी त्यावर तोडगा काढला; परंतु काही मध्यम उद्योजक घराणी यावर तोडगा काढू शकली नाहीत आणि त्याचा परिणाम संपूर्ण उद्योगावर पडताना दिसतो. हा कलह निवारणासाठी काही चांगल्या पद्धती विकसित झाल्या आहेत.

संवाद : अनेक छोटय़ामोठय़ा कुरबुरींकडे दुर्लक्ष केल्याने कित्येक वेळेला मोठा कलह निर्माण होतो म्हणून अनेक उद्योग घराण्यांनी कौटुंबिक विश्वस्त मंडळे गठित केली आहेत. त्यातून छोटय़ामोठय़ा कुरबुरींचा वेळीच निचरा होतो आणि संबंधात सौदार्हता निर्माण होते. काही ठरावीक अंतराने केवळ कौटुंबिक वेळ मिळावा म्हणून काही समारंभ जाणीवपूर्वक नियोजित करावे लागतात आणि त्यात कुठलीही स्पर्धा निर्माण न होणारे (परस्परावलंबित्व दाखवणारे) कार्यक्रम योजावे लागतात.

कौटुंबिक भांडवल : काही वेळेला एकाच प्रकारच्या उद्योगात सर्व कुटुंबीय काम करताना दिसतात. असे झाले की स्पर्धा/ईर्षां निर्माण होते आणि एकमेकांच्या कामात लुडबुड निर्माण होते. तसेच वैयक्तिक क्षमतांचा पूर्ण वापर होत नाही. म्हणून योग्य वेळी संपूर्णपणे वेगळ्या उद्योगाची उभारणी हातात घेऊन त्याची जबाबदारी कुटुंबातील घटकांना द्यावी लागते. यामध्ये मुख्य अडचण येते ती कौटुंबिक भांडवलाची आणि म्हणून भांडवलाची उभारणी व मालकी आणि व्यवस्थापन हे वेगळे ठेवणे अपरिहार्य बनते.

मालकी आणि व्यवस्थापन : सर्व उद्योगांची मालकी एका संस्थेकडे (Holding Company) ठेवून त्या संस्थेमध्ये सर्व कौटुंबिक व्यक्तींना आर्थिक सहभाग देणे आणि विविध उद्योगांच्या उपकंपन्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी कुटुंबातील व्यक्तींना त्यांच्या वकुबांकडे त्यांच्या क्षमतांकडे बघून देणे, जेणेकरून ती व्यक्ती त्याच्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग करेल आणि त्याच वेळी त्याला कुटुंबाचे आर्थिक पाठबळ राहील. अनेक वेळेला वेगळ्या उद्योगांची जबाबदारी घेण्यासाठी कुटुंबातील काही जण कचरतात. त्यासाठी त्यांची भावनिक, मानसिक, शारीरिक तयारी करून घेणे यासाठी दुरोगामी धोरण लागते. अशा प्रकारे वेगवेगळे उद्योग उभे करताना अनुभवी व्यवस्थापकांची नेमणूक हा पर्यायही महत्त्वाचा ठरतो.

नाममुद्रा- रक्षण व संवर्धन : उद्योगाची नाममुद्रा आडनावावरून असेल तर (अ) त्याच्या कायदेशीर बाबींमध्ये अत्यंत तज्ज्ञ माणसाच्या सल्लय़ाने वागणे, (ब) त्याच्या मालकी आणि वापराबद्दल मार्गदर्शक तत्त्वे बनवणे, (क) नाममुद्रा वापरण्यास देण्याआधी त्याच्या व्यवस्थापक मंडळाची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक ठरते.

व्यावसायिक सल्लागार : वेळोवेळी विविध तज्ज्ञ सल्लागारांची  मदत घेणे आवश्यक बनते. कलह जटिल होत आहे असे लक्षात येईल तेव्हा कौटुंबिक लवादाचे गठनदेखील उपयुक्त ठरते.

ऑक्टोबरमध्ये किर्लोस्कर घराण्यातील नाममुद्रेवरून झालेला वाद माध्यमातून चर्चिला गेला. याआधी असे कलह या घराण्यांनी पाहिलेही आणि सोडवलेही आहेत. यातून बोध घेऊन लघू- मध्यम उद्योजकांनी संपत्तीनिर्मितीबरोबरच योग्य वेळेस वारसाहक्काचे नियोजन करण्यावरही लक्ष केंद्रित करायला हवे.