मकरंद जोशी

अनिश शहा हे महिंद्रा अँड महिंद्रा या समूहाचे होऊ घातलेले मुख्य कार्यकारी अधिकारी! महिंद्रा घराण्याच्या वाहन, घरबांधणी, मालवाहतूक, कृषी इत्यादी कंपन्या आजच्या घडीला सूचिबद्ध आहेत. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की, पुढच्या काही वर्षांत महिंद्रा समूहातील नवीन १० कंपन्यांची प्रारंभिक खुली भागविक्री प्रक्रिया होईल. महिंद्राने गुंतवलेल्या भांडवलावर १८% परतावा मिळण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलले आहे. सध्याचा काळ प्रचंड स्थित्यंतराचा आहे; पण भारतातील काही उद्योग समूह या कालावधीत पुढच्या योजना आखण्यामध्ये मग्न आहेत. याच काळात अनिल अंबानी यांची रिलायन्स (एडीएजी), भूषण स्टील, व्हिडीओकॉन असे अनेक उद्योग समूह आर्थिक संकटात गेलेले आढळतात. अशा परिस्थितीत योग्य मार्ग निवडण्याच्या संभ्रमात लघू उद्योजकदेखील दिसतो.

एक उद्योग की अनेक?

एकाच उद्योगावर लक्ष केंद्रित करून त्यात अधिकाधिक प्रावीण्य मिळवणे याविरुद्ध अनेक उद्योगांत आपला हात अजमावणे या वरवर पाहता दोन विरुद्ध विचारांमध्ये लघू/ मध्यम उद्योजक हरवलेला दिसतो. उद्योगाच्या प्रारंभीच्या काळात एकाच उद्योगावर लक्ष केंद्रित करणे हाच मार्ग योग्य दिसतो. एका उद्योगात जम बसल्यावर उद्योजकीय ऊर्जेला जर योग्य मार्ग मिळाला नाही तर ती ऊर्जा वाट फुटेल तिकडे वाहू शकते. हा काळ स्वत:चा शोध घेण्याचा असतो. तो शोध आत (स्वत:शी बोलून) घेण्याऐवजी बाहेर घेतला तर गोंधळ होऊ शकतो. मुख्य उद्योगाच्या परिघावरच्या उद्योगांमध्ये विस्तार हा तुलनेने कमी जोखमीचा होतो. उदा. बांधकाम व्यावसायिकाच्या दृष्टीने स्टील, सिमेंट, पत्रे यांचा व्यापार हे परिघावरचे उद्योग होऊ शकतात. वेगवेगळे उद्योग हाताळण्याची, उभी करण्याची, समजण्याची क्षमता वाढल्यानंतर योग्य संधी मिळताच परिघाबाहेरच्या उद्योगामध्ये उडी घेणे जास्त फलदायी होऊ शकते.

दूरदृष्टी हवी

चांगल्या उद्योजकांकडे दीर्घकालीन योजनांवर काम करणारी स्वतंत्र यंत्रणा असते आणि त्या उद्दिष्टांचे छोटय़ा उद्दिष्टांमध्ये रूपांतर करून काम करण्यासाठीची व्यवस्थापन यंत्रणा वेगळी असते. विविध उद्दिष्टांचा प्राधान्यक्रम ठरवताना यश मिळण्याच्या शक्यतेचे प्रमाण, अंगभूत क्षमता आणि विकासासाठी लागणारा वेळ-पैसा-श्रम, दुरोगामी स्थिरता, भांडवलवरचा परतावा, सामाजिक बांधिलकी आदी अनेक गोष्टींवर आधारित निकषांवर निर्णय घ्यावे लागतात. या निकषांची बांधणी चुकली किंवा काही निकष ध्यानात न ठेवता घेतलेले निर्णय आत्मघातकी ठरू शकतात. उद्योजकाच्या स्वत:च्या, त्याच्या मनुष्यबळाच्या आणि त्याच्या संसाधनात्मक क्षमता यावर जे उद्योग वेळ-पैसा-श्रम खर्च करतात ते उद्योग मोठी उडी मारू शकतात. क्षमता विकसित न करता भावनेच्या भरात केलेला विस्तार संपूर्ण उद्योग समूहाला प्रभावित करू शकतो.

भांडवल उभारणी

मुख्य आणि उपकंपन्यांमध्ये योग्य वेळी (म्हणजे उद्योग विशिष्ट नैपुण्य आणि आर्थिक पातळीवर पोहोचल्यावर) भांडवल उभारणी आणि त्याची योग्य गुंतवणूक करण्याची क्षमता हा उद्योग उभारणीमध्ये महत्त्वाचा टप्पा आहे. मागील लेखांमध्ये उल्लेखिल्याप्रमाणे हा काळ नवनिर्माणाचा आहे आणि अशा वेळी दीर्घ मुदतीची उद्दिष्टे निश्चित करून क्षमता विकसित करण्यासाठी, पायाभरणी करण्यासाठी योग्य काळ आहे.