मकरंद जोशी

भांडवली बाजाराच्या माहितीप्रमाणे इन्फोसिसच्या प्रवर्तकांपैकी एक – नंदन निलेकणी यांच्या कंपनीतील समभागांचे (शेअर्स) मूल्य ४,४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. वर्ष २०२० मध्ये सुमारे ८५ कोटी रुपयांपेक्षा जास्त लाभांश (डिव्हिडंड) त्यांना मिळाला आहे. गंमत म्हणजे इन्फोसिसमध्ये मूळ प्रवर्तकांपैकी बहुतेक प्रवर्तक आता संचालक राहिलेले नाहीत. याचा अर्थ १९८१ साली स्थापित केलेल्या या कंपनीच्या मूळ प्रवर्तकांपैकी बहुतेक सर्व प्रवर्तक निवृत्त झाले आहेत. याला म्हणतात समृद्ध निवृत्ती!

अनेक वेळेला आपण चालू केलेला उद्योग योग्य वेळी नव्या पिढीला हस्तांतरित झाला नाही तर अवकळावस्थेत जातो. आज कित्येक उद्योजकांची पुढची पिढी परदेशात स्थिरावली आहे आणि बऱ्याच वेळेला त्यांना हा उद्योग चालवण्यात रस नसतो. तर कधी वारस असूनदेखील त्याला योग्य पद्धतीने हस्तांतरित होताना दिसत नाही.

चालू केलेल्या प्रत्येक गोष्टीला शेवट आहे. तो शेवट स्वत:हून केला नाही तरी प्रकृती तो करतेच! तटस्थपणे निवृत्तीची रणनीती आखणे आवश्यक आहे. यात पर्याय असू शकतात. आपल्यासाठी उपयुक्त पर्याय निवडून त्यावर मेहनत घेणे महत्त्वाचे.

नातेवाईकाला उत्तराधिकारी नेमणे

मुलाला उत्तराधिकारी नेमायचा असेल तर विषय सोपा आहे. एकापेक्षा जास्त वारस जर असतील तर एका वारसाला जास्त अधिकार देणे किंवा उद्योग विभागून देणे हे पर्याय राहतात. हे करताना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याला उत्पादन, विक्री, मनुष्यबळ, आर्थिक कायदा, संबंध अशा सर्व बाबींमध्ये निपुण करणे तसेच घराण्याची मूल्य बिंबवणे आणि त्याचे वेळोवेळी पुनरावलोकन करणे आवश्यक आहे. तसेच याबद्दल कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करणे अपरिहार्य आहे.

व्यावसायिक संचालकांचे नेतृत्व

जर नातेवाईकांपैकी एक वारस निवडणे शक्य नसेल तर योग्य संचालक मंडळ गठीत करणे आणि कंपनी चालवू शकणाऱ्या सक्षम संचालकाच्या हातात कंपनीची धुरा सोपवणे आवश्यक आहे. ही निवड प्रक्रिया अतिशय काटेकोर निभावणे आवश्यक आहे. मूल्य, धडाडी, वय, अनुभव, पूर्वानुभव, दूरदृष्टी या निकषांवर तावून सुलाखून करण्यासाठी काही ज्येष्ठ व्यक्तींची समिती गठीत करणे कधीही चांगले.

व्यवसाय विकणे

वरीलपैकी पर्याय किंवा तेवढा वेळ नसेल तर योग्यवेळी आपला व्यवसाय दुसऱ्या उद्योगांमध्ये विलीन करणे किंवा विकणे हा पर्यायही खूप उपयुक्त आहे. आपल्या व्यवसायाची बांधणी अशा प्रकारे करावी की त्याचे योग्य वेळी चांगले मूल्य मिळेल आणि तो गुंतवणूकदारांना आकर्षित करून घेऊ शकेल. मागील काही लेखात याबद्दल उल्लेख आलेला आहेच. त्यासाठी तज्ज्ञ सल्लागारांची नेमणूक आवश्यक आहे.

पब्लिक इश्यू

सर्वात जास्त पैसे मिळवून देणारा पर्याय म्हणजे आपल्या कंपनीचा आयपीओ (प्रारंभिक खुली भागविक्री) आणणे आणि हळूहळू एक चिरकाल टिकणारी संस्था उभी करणे जी स्वत:च स्वत:ला चालवेल. चांगले कर्मचारी, चांगले सल्लागार, चांगले संचालक आणि गुंतवणूकदार जोडलेले असतील तर हे साध्य करणे शक्य आहे. उद्योजकाने निवृत्तीबद्दल रणनीती बनवली नाही तर स्पर्धक ग्राहकांना घेऊन जातात आणि तयार झालेली मालमत्ता प्रसंगी कर्जदार आणि सरकारच घेऊन जाऊ शकते!