22 October 2020

News Flash

बंदा रुपया : धातू क्षेत्रातील बंध!

नोकरी सोडून शहरातील शहागंजमध्ये रमण आजगांवकर यांनी फॅब्रिकेशनचे दुकान सुरू केले

सुहास सरदेशमुख

धातूचे एक स्वतंत्र शास्त्र असते. त्याचे बंध, त्याची लवचीकता, त्याचा कणखरपणा याची परिमाणे निरनिराळी. कार्बनचे प्रमाण किती यावर सारे काही बदलत असते. आपल्या भोवतालच्या किती तरी वस्तूंमध्ये असणारे त्याचे अस्तित्व कधी दिसत असते, कधी ते लक्षातच येत नाही. मालमोटारीवरून लोखंडी पत्र्यांचा गुंडाळा नेताना आपण अनेकदा पाहतो. हा पत्र्याचा गुंडाळा आणि त्यापासून बनणाऱ्या वस्तूंची मोजदाद करता येणेही शक्य होणार नाही. फ्रीजचा दरवाजा लोखंडी पट्टय़ांवर अवलंबून असतो किंवा ऑटो रिक्षांचे इंडिकेटर ज्या खोबणीत बसते त्या धातूचा प्रकार वेगळा आणि महिला डोक्यातील केसांना लावतात ती पीन वेगळी. त्यातील कार्बनचे प्रमाण वेगळे. धातूच्या मोठय़ा पट्टय़ांच्या गुंडाळ्यातील पत्रा कोणत्या कारणासाठी वापरावयाचा आहे यावर त्यात बदल करावे लागतात. दुचाकी सुरू करताना कुलूप ज्यामध्ये बसते असा पत्रा किंवा सीटच्या खालचा पत्रा यातही फरक असतो. अशा धातुपट्टय़ांच्या व्यवसायात औरंगाबादमधील उद्योजक रमण आजगांवकर आणि संजय लताड काम करतात. ‘सीआरसीए’ स्टील हे त्यांचे क्षेत्र. सोप्या भाषेत गरम केलेला पत्रा हा कच्चा माल आणि प्रक्रिया करून त्याला गरम न करता शीत अवस्थेतच त्यांची रुंदी किंवा कणखरपणा कमी जास्त करण्याच्या क्षेत्रात २०० मिलीमीटर रुंदीच्या लोखंडी पट्टय़ांच्या क्षेत्रात केशव मेटल प्रायव्हेट लिमिटेडचे नाव आहे.

एखाद्या लोखंडी पट्टीची जाडी दोन मिलीमीटर असेल आणि एखाद्या वस्तूनिर्मितीमध्ये ती जाडी एक मिलीमीटरची हवी असेल तर लाटणे जसे काम करते तसे काम करणाऱ्या यंत्रांच्या आधारे त्याची रुंदी कमी करण्याच्या क्षेत्रातील या कंपनीची उलाढाल गेल्या वर्षीपर्यंत नऊ कोटी साठ लाखांची. आता नवा विस्तार आणि नव्या उत्पादनासह तिची वाढ सुरू आहे. रमण आजगांवकर हे बजाज ऑटोत नोकरीला होते. नोकरी सोडून शहरातील शहागंजमध्ये रमण आजगांवकर यांनी फॅब्रिकेशनचे दुकान सुरू केले. घराचे ग्रिल, गेट येथपासून सुरू झालेल्या व्यवसायातून उद्योगातील फॅब्रिकेशनच्या कामाला त्यांनी सुरुवात केली. त्यांचे मित्र संदीप नागोरी यांनी आजगांवकरांच्या उद्योजकता वाढीला मदत केली. व्यवसायात पडल्यानंतर नवे करण्याची इच्छा होती. जाईल तेथे किंवा खास करून जेव्हा मुंबईला ते जात तेव्हा बाजारपेठेचा शोध सतत सुरू असे. खरे तर भागीदाराचा व्यवसाय फारशी उन्नती करून देत नाही, असे अनुभव सांगणारे उद्योगक्षेत्रात खूप आहेत. पण आजगांवकर आणि संजय लताड यांनी भागीदारीमध्ये कामे वाटू घेऊन उद्योगाची प्रगती करण्याचा प्रयत्न केला. त्याला आध्यात्मिक, वैचारिक मैत्री करणीभूत ठरल्याचे आजगांवकर सांगतात. डोळसपणे केले जाणारे वाद वाढीसाठी चांगले असतात असाच त्यांचा अनुभव आहे.

कोणता व्यवसाय निवडावा यासाठी आजगांवकरांनी मुंबई-पुणे येथील अनेक बाजारपेठा पालथ्या घातल्या. व्यवसायवृद्धीला बाजारपेठेनुसार बदलत जावे लागते. ही बाब आजगांवकर अनुभवातून शिकले. अनेक दिवस दुकानांच्या लोखंडी शटरसाठी लागणारे साहित्य पुरविले. एकेकाळी या व्यवसायातही तेजी होती. पण २००७-०८ मध्ये छतांच्या पत्र्यांच्या व्यवसायात मोठे बदल झाले. निर्यात केल्या जाणाऱ्या किंवा दर्जामुळे नाकारल्या गेलेल्या गॅल्व्हनाईज पत्र्याचा उपयोग शटर बनविण्यासाठी होत होता. त्यामुळे मूळ व्यवसायात तसा फटका बसला. बाजारपेठेचा योग्य अंदाज न आल्याने आणि तातडीने बदल न स्वीकारल्याने आर्थिक संकट उभे ठाकले. पण परिवाराच्या पाठिंब्यामुळे याच क्षेत्रात पाय रोवून उभे राहायचे ठरविले. धातुशास्त्रातील तज्ज्ञ सुरेश बालपांडे यांचा केशव मेटल्स व्यवसाय सुरू करताना खूप उपयोग झाला. कोणत्या रुंदीच्या व जाडीच्या पत्र्यातील व्यवसाय टिकतील याचा अंदाज त्यांच्याकडून मिळाला होता. पुढे घडलेही तसेच. नॅरो किंवा वाईड या दोन पट्टय़ांमध्येच काम होत राहील आणि मध्यम आकाराच्या लोखंडी पट्टय़ाचे क्षेत्र तसे घसरणीला लागेल असा त्यांचा अंदाज होता. पुढे त्यामुळे २०० मिलीमीटर रुंदीच्या पत्र्यातील व्यवसाय सुरू झाला. सर्वसाधारणपणे हॉट रोल्ड कॉइल हा या व्यवसायाचा कच्चा माल. लोखंड तापवून त्याचा आकार बदलल्यानंतर कोल्ड रोल पद्धतीने त्याचा आकार बदलणे. कणीक मळताना जशी लाटणे फिरवून आकार देण्याची पद्धत धातूमध्ये वापरतो, अशी ती प्रक्रिया. अशा लोखंडी पट्टय़ाचा अनेक वस्तूनिर्मितीमध्ये उपयोग होतो. टाटा स्टील, जेएसडब्ल्यू, आर्सेलर मित्तल, पॉस्को या कंपन्यांकडून हॉट रोल घेऊन त्याला कोल्ड रोल पद्धतीने हव्या त्या आकारात आणणे हे केशव मेटल्सचे उत्पादन. पण स्टीलच्या काय किंवा अन्य कोणत्याही उत्पादन क्षेत्रात बाजारपेठांमधील योग्य अंदाज येणे हे यशस्वी उद्योजकतेचे लक्षणे असते. बाजारपेठेचा अंदाज थोडा जरी चुकला तर फटका बसतो. पण त्यावर मात करणारा भागीदारीतील उद्योग म्हणून केशव मेटल्सचे नाव आहे.

गेल्या काही वर्षांतील अनुभव आणि कोविड काळातील अनुभव वेगळा आहे. एका अर्थाने हे व्यावसायिकदृष्टय़ा मोठे संकट. आजगांवकरांच्या उद्योग आयुष्यातील हे तिसरे संकट पण करोनाकाळात दररोजच्या धबडग्यातून विचार करायला वेळ मिळाला. या काळात कंपनीमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधील बंध अधिक मजबूत झाले. सकारात्मक सूचनाही वाढल्या. भागीदारीच्या व्यवसायात कामे वाटून घेतल्यामुळे अनेक अर्थाने पुढे जाता आल्याचेही आजगांवकर सांगतात. कंपनीतील निर्माण प्रक्रियेचे नियोजन आणि आर्थिक बाबतीतील नियोजन संजय लताड करत. दोघांचा वेळ नियोजनात अधिक जात असे. पण आता कंपनीतील अधिकारी आणि कर्मचारी अधिक चांगल्या सूचना करत आहेत. कोविड काळात आपण सारे एक आहोत, ही भावना जागृत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून नव्या उत्पदनाची तयारी केशव मेटल्स ही कंपनी आहे. तसा चमू लहानच. केवळ १९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जोरावर सुरू असणारा कंपनीचा विस्तार आता वाढतो आहे. बँक ऑफ बडोदाकडून कोविड काळात कर्ज उपलब्ध झाल्याने आणखी विस्ताराची कंपनीची तयारी सुरू आहे. लोखंडी पत्र्याची लांबी वाढविताना त्याला उष्णता देण्याऐवजी शीत प्रक्रियेतून हव्या त्या दर्जाच्या लोखंडी पट्टय़ा तयार करण्याचा व्यवसाय जसजशी बाजारपेठ फुलेल तसा वाढू लागेल.

भागीदारीचे इंगित..

केशव मेटल या कंपनीचे वैशिष्टय़ म्हणजे भागीदारीतून यश. अनेक उद्योजक भागीदारीतून बाहेर पडल्यावर अधिक मोठा झालो असे सांगतात. पण भागीदारीनेही व्यवसाय टिकतात आणि अशी अनेक उदाहरणे असल्याचा आजगांवकरांचा दावा आहे. निर्णय घेताना वाद होतात, पण वाद डोळसपणे बघण्याची वृत्ती विकसित व्हावी लागते. भागीदारीच्या व्यवसायातील ते इंगित आहे. आजगांवकर म्हणतात -‘‘ मेटल म्हणजे धातू हे देखील बंध किती मजबूत किंवा किती लवचीक हे त्यातील कार्बन बाँडवर ठरलेले असते. व्यवसायही असाच असतो. नाही का?’’

रमण आजगांवकर / संजय लताड केशव मेटल प्रा. लिमिटेड

’ उत्पादन  :                २०० मिलीमीटर रुंदीपर्यंत धातुपट्टय़ा

’ प्राथमिक गुंतवणूक     :      २६ लाख रुपये

’ सध्याची उलाढाल             : वार्षिक  ९.६ कोटी रुपये

’ कर्मचारी संख्या  :            १९

’ संकेतस्थळ :              www.keshavmetals.com

लेखक ‘लोकसत्ता’चे औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी

suhas.sardeshmukh@expressindia.com

आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस, सूचना ई-मेल: arthmanas@expressindia.com वर कळविता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2020 12:01 am

Web Title: entrepreneur from maharashtra businessman in maharashtra zws 70
Next Stories
1 उभारीबाबत आशावादाचे ‘क्रिकेट’मय निरूपण
2 बँका, स्थावर मालमत्ता समभाग तेजीत
3 मार्च तिमाहीत विक्री करोनापूर्व पातळीपेक्षा सरस राहण्याचा ‘ब्लू स्टार’चा अंदाज
Just Now!
X