01 March 2021

News Flash

उद्यमशील, उद्य‘मी’ : गुंतवणूकदारांचे मूल्यशिक्षण

कुठलीही कायदेशीर पार्श्वभूमी नसलेल्या संस्थांमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांची काहीच चूक नाही का?

(संग्रहित छायाचित्र)

मकरंद जोशी

किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सहा संचालकांवर सेबीने २१ ऑक्टोबर २०२० रोजी कारवाई केली आणि २०१० मध्ये घडलेल्या एका कथित गैरव्यवहाराबद्दल एकूण नऊ जणांना मिळून १४.६ कोटी रुपयांचा दंड आणि दोन संचालकांना (जे किर्लोस्कर कुटुंबीयांपैकी आहेत) ६ महिन्यांसाठी शेअर बाजारातील व्यवहारावर बंदी घातली आहे. याच काळात यश बिर्ला – (बिर्ला कुटुंबीयांपैकी एका प्रवर्तकाला) आणि त्यांच्या कंपनीला ‘पब्लिक इश्यू’मार्फत उभारलेल्या निधीमध्ये २०११ मध्ये घडलेल्या अपहाराबद्दल दोन वर्षांंसाठी शेअर बाजारातील व्यवहारावर बंदी घातली आहे. या घटना पाहिल्यावर असा प्रश्न पडतो की, इतक्या मोठय़ा आणि घरंदाज श्रीमंत घरातल्या व्यक्तींकडून अशा चुका का घडत असतील?

शारदा घोटाळ्यात गुंतवणूक कोणाची? : गेल्या काही वर्षांत सेबीने ६५०च्या आसपास अनधिकृत गुंतवणुकीच्या योजना चालवणाऱ्या प्रवर्तकांवर कारवाई करून जप्ती आणली. पण अशा योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सामान्य माणसाची ‘यामध्ये काहीच चूक नाही का?’ योजना चालवणाऱ्यांची लालसा वाईट आणि ‘यामध्ये अधिक पैशाच्या लोभापायी गुंतवणूक करणाऱ्या सामान्य माणसाची लालसा मात्र योग्य’ असा भेदभाव आपण करू शकतो का? कुठलीही कायदेशीर पार्श्वभूमी नसलेल्या संस्थांमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांची काहीच चूक नाही का? आपल्याच नातेवाईक आणि आप्तेष्टांना अशा योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रेरित करणाऱ्या आणि दलाली घेणाऱ्यांची चूक नाही का? याबद्दल बोलले जात नाही. मात्र आपली लालसाच दुसऱ्या (कदाचित आपल्यापेक्षा जास्त लालची माणसाला) आपल्या आयुष्यात आमंत्रण देत असते!

भला उस की कमीज मेरे कमीज से सफेद क्यूँ?

अर्जुनाने गीतेच्या तिसऱ्या अध्यायात कृष्णाला विचारले की, ‘मनुष्य त्याची इच्छा नसताना जणू काही जबरदस्तीच पाप करण्यास प्रेरित का होतो?’ त्याचे उत्तर देताना श्रीकृष्ण माणसाच्या अनियंत्रित इच्छांवर बोट ठेवतो. माझ्याकडे असलेली संपत्ती दुसऱ्याकडे असलेल्या संपत्तीपेक्षा कमी का? या प्रश्नाने जेव्हा मन ग्रासते आणि जगज्जेता होण्याच्या इच्छेने माणसाचे मन जेव्हा पछाडते तेव्हा त्याला योग्य/अयोग्य यातील फरक दिसेनासा होतो. इच्छा आणि कामना त्याच्या मनावर ताबा मिळवतात आणि त्याच्याकडून अशा चुका होतात. परंतु मनुष्य स्वभावाप्रमाणे कोणाला तरी दोष देऊन आपली जबाबदारी दुसऱ्यावर झटकणे हे खूप सोपे उत्तर आपल्यालाही हवे असते.

शक्तिमान सेबी : आजच्या घडीला सेबी ही सर्वात सक्षम आणि ताकदीची नियंत्रक यंत्रणा आहे. कायदे बनवण्याच्या अधिकारापासून त्याच्या अमंलबजावणीपर्यंत सर्वच अधिकार एकाच नियंत्रकाकडे असण्याचा प्रसंग तसा विरळाच. प्रभात डेअरी / कार्वी फिनटेक अशा हल्लीच्या घटनांवरून सेबीची कारवाई आता अधिक जलद होऊ लागली आहे याची खात्री पटते. परंतु गुंतवणूकदारांचे संरक्षण कुठल्याही बाहेरच्या माणसांकडून करायचे नसून ते त्याच्या लालसेपासून करायचे आहे. चांगल्या आणि वाईट कंपन्यांमधला फरक, कौशल्य आणि चोरी यातील फरक गुंतवणूकदारांना, संचालकांना समजणे आवश्यक आहे (हा फरक कळणे सोपे नाही). हे जर सेबीने लक्षात घेतले आणि गुंतवणूकदारांच्या प्रबोधनासाठी आणि मूल्य शिक्षणासाठी त्याच तत्परतेने वेळ आणि पैसे खर्च केला तर अधिक परिणामकारक काम होईल!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 12:21 am

Web Title: entrepreneurial article on value education of investors abn 97
Next Stories
1 रिलायन्स-फ्युचर ग्रुपचा २५ हजार कोटींचा व्यवहार रखडला; Amazon ठरली निमित्त
2 करदात्यांना मोठा दिलासा! आयकर भरण्याची तारीख वाढवली
3 आदित्य बिर्ला फॅशनमध्ये ‘फ्लिपकार्ट’ची हिस्सेदारी
Just Now!
X