रसायनांचा वापर न करता नैसर्गिक खते वापरून कापसाची निर्मिती आणि त्यावर बेतलेली पर्यावरणस्नेही पद्धतीने कपडय़ांची संकल्पना, रचना तसेच निर्मिती ही पर्यावरणाच्या संतुलन व संवर्धनासाठी संपूर्ण जगाची गरज बनली असून, राज्यातील सरकारचीही या दिशेने कटिबद्धता म्हणून पर्यावरणस्नेही वस्त्रनिर्मितीला समर्पित अशी विशेष वस्त्रोद्योग उद्याने (स्पेशल टेक्स्टाइल पार्क) उभारण्यासाठी सहकार्य व मदत केली जाईल, अशी घोषणा राज्याचे वस्त्रोद्योग, सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केली.
पर्यावरणपूरक उपक्रमांचा भर हा पुनरावर्तन, पुनर्वापर आणि लघुकरण यावर असल्याने वस्त्रनिर्मितीतही अशा नवनवीन तंत्रज्ञानाचे विकसन या क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त करावे, असे आवाहनही पाटील यांनी फॅशन तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना केले. पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षक संस्थेचे स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (सॉफ्ट) आणि चर्चगेटस्थित निर्मला निकेतन संस्थेने संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘ग्रीन फॅशन महासंगम (सीजीएफ)’ संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी पाटील बोलत होते. जागतिक वस्त्रोद्योगाच्या व्यापारात देशाचे पारडे आणखी प्रबळ बनविण्यासाठी या पर्यावरणपूरक नावीन्यतेचे मोठे योगदान असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी संमेलनाच्या व्यासपीठावर क्लोदिंग मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ इंडिया या वस्त्रनिर्मात्यांच्या संघटनेचे अध्यक्ष राहुल मेहता, सीजीएफचे अध्यक्ष व पिडिलाइटचे मुख्याधिकारी राजेश बालकृष्णन, सॉफ्टचे अध्यक्ष विश्वास देवल, निर्मला निकेतनच्या डॉ. इला देढिया आदी उपस्थित होते.