वाढते नागरीकरण, औद्योगिकीकरण या बरोबरीनेच मग पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्यासाठी मल:निस्सारण, सांडपाणी व्यवस्थापन, जल-संवर्धन आणि पाण्याचा पुनर्वापर वगैरे सेवा-सुविधांची तजवीज करणे अपरिहार्यच ठरते. अशा सेवा-सुविघांसह औद्योगिक घनकचऱ्यासह, हानीकारक उर्वरकांच्या विल्हेवाटीची भारतातील बाजारपेठ वर्षअखेर ३.२ अब्ज युरो (२७,१०० कोटी रुपयांवर) जाण्याचा अंदाज आहे.
वाढत्या शहरीकरणाबरोबरीनेच जनमानसात पर्यावरण-जतनाच्या आस्था आणि जाणिवा उंचावत असून, आधुनिक पर्यावरणीय तंत्र-तंत्रज्ञानाचा वापर आता प्रत्येक क्षेत्रात होऊ लागला आहे, ज्या परिणामी मोठय़ा गुंतवणुकीची तयारी उद्योगक्षेत्राकडून दर्शविली जात आहे, असे एमएमआय इंडिया प्रा. लि.चे मुख्याधिकारी डॅरिल डिसिल्व्हा यांनी सांगितले. जलसंसाधन, मल:निस्सारण, रिफ्युज आणि रिसायकलिंग तंत्र-तंत्रज्ञानातील अग्रणी ११० कंपन्यांना एका मंचावर आणणाऱ्या ‘आयफॅट इंडिया २०१३’ या प्रदर्शनाचे गुरुवारी उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. हे प्रदर्शन गोरेगावच्या मुंबई प्रदर्शन संकुलात शनिवापर्यंत सुरू आहे. जगाच्या लोकसंख्येचा १६ टक्के हिस्सा सामावून घेणाऱ्या भारताचा जागतिक जल संसाधनात वाटा ४ टक्के आहे. उलट देशाच्या भूगोलाचे २५ टक्के दराने नागरीकरणाकडे संक्रमण सुरू असून, २०३० पर्यंत देशात प्रति वर्षी तयार होणारा सर्व प्रकारचा घनकचरा हा तिपटीने वाढून १२५०० कोटी टनांवर जाईल, असेही डिसिल्व्हा यांनी सांगितले.