निवृत्तिवेतन निधीचे व्यवस्थापन ‘कर्मचारी भविष्य निधी संघटना’ने (ईपीएफओ) सरलेल्या जुलै महिन्यांत ११ लाख दाव्यांचे निवारण केले असून, त्यात भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) खात्यांचे हस्तांतरण व खात्यातून रक्कम काढण्याचाही समावेश आहे. एप्रिल ते जुलै २०१४ या चार महिन्यांसाठी हेच प्रमाण ४३ लाख असे आहे.
‘ईपीएफओ’ने कात टाकून साधलेल्या कार्यात्मक सक्रियतेचा पुरावा म्हणजे चार महिन्यांत निपटारा झालेल्या ४३ लाख प्रकरणांपैकी ६८ टक्के दाव्यांचे निवारण हे १० दिवसांच्या आत केले गेले आहे.
शिवाय सरलेल्या २०१३-१४ या आर्थिक वर्षांअखेपर्यंत भविष्य निधी संघटनेकडे नोंद ९२ टक्के  कर्मचाऱ्यांच्या खात्यांच्या नोंदी अद्ययावत केल्या गेल्या आहेत. ही एक अभूतपूर्व कामगिरीच असून, गेल्या ३० वर्षांत हे पहिल्यांदाच घडले आहे.
सामायिक खाते क्रमांकांचे कार्यान्वयन १५ ऑक्टोबरपासून
ईपीएफओ अलीकडेच आपल्या ४.१७ कोटी सहभागी सदस्यांना सामायिक खाते क्रमांक वितरित केले असून, ते त्यांच्या नियोक्त्यांना सुपूर्द करण्यात आले आहेत. नियोक्त्यांनी या क्रमांकाप्रमाणे आपल्या कर्मचाऱ्यांच्या बँक खाते, पॅन आणि आधार यांसारख्या ओळख पटवून प्रमाणपत्रांची (केवायसी तपशिलांची) माहिती ईपीएफओला कळवायची आहे. आजवर अशा ३० लाख सदस्यांचा केवायसी तपशील प्राप्त झाला असून, ईपीएफओने यासाठी १५ सप्टेंबर २०१४ या अंतिम मुदतीपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. संपूर्ण ४.१७ कोटी सहभागी सदस्यांचे सामायिक खाते क्रमांक १५ ऑक्टोबरपासून कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. हा असा खाते क्रमांक असेल जो कर्मचाऱ्याच्या संपूर्ण सेवाकाळात कायम राहील आणि नोकरी बदलल्याने पीएफ खात्यातही बदलासाठी अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही.