निवृत्तीपश्चात निर्वाहाच्या निधीचे अर्थात कर्मचाऱ्यांच्या ‘पीएफ’चे व्यवस्थापन पाहणाऱ्या भविष्यनिधी संघटना अर्थात ‘ईपीएफओ’ने कर्मचारी सदस्यांच्या तक्रार आणि गाऱ्हाण्यांच्या गतिमान निवारणासाठी व्हॉट्सअ‍ॅप या जनमाध्यम व्यासपीठामार्फत मदतवाहिनी सुरू केली आहे.

ईपीएफओ विद्यमान तक्रार निवारणाचे पर्याय म्हणजे संकेतस्थळ, फेसबुक व ट्विटर यासारखी समाजमाध्यमे तसेच अहोरात्र सुरू राहणारे कॉल सेंटर यांच्या बरोबरीने  व्हॉट्सअ‍ॅप हे अतिरिक्त साधन उपलब्ध  असेल, असे केंद्रीय कामगार मंत्रालयाने मंगळवारी स्पष्ट केले.

ईपीएफओच्या देशभरातील सर्व १३८ क्षेत्रीय कार्यालयांकडून ही व्हॉट्सअ‍ॅप मदतवाहिनी कार्यान्वित केली गेली आहे, असे कामगार मंत्रालयाने स्पष्ट केले. त्या त्या क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रमुखांशी थेट संपर्क व संवाद साधून आवश्यक ती मदत वेगाने मिळविण्यासाठी हे अत्यंत प्रभावी साधन ठरेल. संबंधित क्षेत्रीय कार्यालयांचे हेल्पलाइन क्रमांक हेच त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक असतील, असेही स्पष्टीकरण कामगार मंत्रालयाने दिले आहे. ईपीएफओच्या अधिकृत संकेतस्थळावरही त्या त्या क्षेत्रीय कार्यालयांचे व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक देण्यात आले आहेत.

आजवर प्रयोग म्हणून ठरावीक क्षेत्रीय कार्यालयांकडून व्हॉट्सअ‍ॅप जनमाध्यमांचा वापर सुरू होता, त्यायोगे १,६४,०४० इतक्या शंका आणि गाऱ्हाणी सोडविली गेली आहेत.