जुलै महिन्यात ‘इक्विटी’ फंडात १२,०३७ कोटींचा सार्वकालिक उच्चांकी गुंतवणूक ओघ

सामान्य जनांना अच्छे दिन आल्याविषयी साशंकता असली तरी केंद्रात सत्ताबदल झाल्यापासून सामान्य गुंतवणूकदारांच्या कृपेने म्युच्युअल फंड उद्योगाला मात्र चांगले दिवस आले असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. जुलैअखेर म्युच्युअल फंडाची एकत्रित मालमत्ता १९.९६ लाख कोटींवर पोहोचली आहे. एकूण ४२ फंड घराणी असलेल्या या उद्योगाने मे २०१४ अखेर पहिल्यांदा १० लाख कोटींचा टप्पा गाठला होता आणि तीन वर्षांत मालमत्ता जवळपास दुप्पट झाली आहे.

म्युच्युअल फंडाच्या वेगवेगळ्या फंड गटांपैकी मागील तीन वर्षांत सर्वाधिक गुंतवणूक बॅलन्स्ड फंडात झाली असून त्या खालोखाल इन्कम फंडांचा क्रमांक लागतो. जुलै महिन्यांत ६३,५०४ कोटी म्युच्युअल फंडात नव्याने गुंतविल्याचे म्युच्युअल फंडांची शिखर संघटना असलेल्या ‘अ‍ॅम्फी’ने जाहीर केलेल्या आकडेवारीत दिसून आले आहे. शेअर बाजार निर्देशांक रोज नवीन सार्वकालिक उच्चांक स्थापित करत असल्याने गुंतवणूकदारांचा उत्साह द्विगुणित झाल्याचा परिणाम या आकडेवारीत दिसून येत आहे. जुलै महिन्यांत समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडात एकूण १२,०३७ कोटींची गुंतवणूक झाली असून हा सार्वकालिक उच्चांक आहे. या गुंतवणुकीपैकी निम्मी रक्कम नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या (एसआयपी) माध्यमातून आली असून दरमहा  एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात होणाऱ्या गुंतवणुकीत वाढ होताना दिसत आहे.

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक या संकल्पनेचा प्रसार होण्यासाठी दर महिन्याच्या ७ तारखेला ‘म्युच्युअल फंड डे’ साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून ‘लोकसत्ता’ने या उद्योगातील विविध घटकांशी संवाद साधला. संवादादरम्यान गुंतवणूकदारांच्या मनातल्या काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. निर्देशांक रोज नवीन नवीन उच्चांक प्रस्थापित करीत असतांना गुंतवणूकदारांच्या मनात आपल्या गुंतवणुकीच्या सुरक्षिततेविषयी थोडी भीतीसुद्धा जाणवली.

गुंतवणूकदाराच्या मनातील हा भीतीचा धागा पकडून, म्युच्युअल फंड उद्योगातील द्वितीय क्रमांकाची मालमत्ता कंपनी असलेल्या एचडीएफसी म्यच्युअल फंडाच्या उत्पादने व प्रशिक्षण विभागाचे उपाध्यक्ष असलेल्या अशोक कानावाला यांना विचारले असता ते म्हणाले, ‘शेअर बाजारात पहिल्यांदाच परकीय वित्तसंस्थांपेक्षा भारतीय अर्थसंस्था अधिक गुंतवणूक करीत आहेत. या गुंतवणुकीत म्युच्युअल फंडाचा मोठा वाटा आहे. गुंतवणूकदारांना ‘एसआयपी’चे महत्त्व दिवसेंदिवस पटत असून दिवसागणिक ‘एसआयपी’च्या संख्येतील वाढीतून हे दिसून येते. परिणामी मागील संपूर्ण आर्थिक वर्षांत जितकी रक्कम एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवली गेली त्याच्या निम्म्याहून अधिक रक्कम या आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत म्युच्युअल फंडात एसआयपीच्या माध्यमातून आली आहे.’ म्युच्युअल फंडात दरमहा सरासरी साडेचार हजार कोटी रक्कम एसआयपीच्या माध्यमातून गुंतविली जात असून जुलै महिन्यात या रक्कमेत १०० कोटींनी वृद्धी झाली आहे.

‘गुंतवणूकदारांना एसआयपीचे महत्त्व पटले असून गुंतवणूकदार स्वयंप्रेरणेने एसआयपी करण्यास पुढे येत आहेत. हे जाणून आम्ही ऑगस्ट महिन्यासाठी ४५ हजार नव्या एसआयपींची नोंदणी करण्याची लक्ष्य निश्चित केले आहे. या आधी मागील वर्षी जुलै २०१६ मध्ये २० हजार एसआयपींची नोंदणी करण्याचे लक्ष्य आम्ही यशस्वीपणे पार पाडले होते. असे प्रुडंट कॉर्पोरेट सव्‍‌र्हिसेसचे साहिल शेख यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

निर्देशांक नवीन उच्चांक गाठत असल्याने आपल्या गुंतवणूक मूल्यात घट होण्याची काळजी वाटते काय? असा प्रश्न प्रातिनिधिक रूपात विचारला असता, ‘मी नोकरीला लागल्यापासून म्युच्युअल फंडात एसआयपी करीत आहे. ही गुंतवणूक मुख्यत्वे माझ्या मुलाच्या शैक्षणिक खर्चाची तजवीज करण्यासाठी व सेवानिवृत्ती पश्चात जीवनमानासाठी करीत आहे. माझा मुलगा दोन वर्षांचा असून माझ्या सेवानिवृत्तीस अद्याप बराच काळ असल्याने माझी म्युच्युअल फंडातून गुंतवणूक काढून घेण्याचा माझा विचार नाही,’ असे म्युच्युअल फंड गुंतवणूकदार व महावितरण कंपनीतील लेखा व्यवस्थापक श्रद्धा पोवार म्हणाल्या.