मुंबई : सरलेल्या सप्टेंबर महिन्यात समभागसंलग्न (इक्विटी) म्युच्युअल फंडांतील नक्त गुंतवणूक ६,४८९ कोटी रुपये अशी मागील चार महिन्यांतील नीचांक गाठणारी राहिली आहे. कंपनी करात कपातीच्या निर्णयाने तेजाळलेल्या भांडवली बाजारात, गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडाचे युनिट्स विकून नफा पदरी बांधून घेतल्याचा हा परिणाम आहे.

म्युच्युअल फंडाची संघटना ‘अ‍ॅम्फी’कडून प्रस्तुत आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यांत समभागसंलग्न म्युच्युअल फंडात ६,६०९ रुपयांची गुंतवणूक आली, तर १२० कोटी रुपयांची निर्गुतवणूक झाली. परिणामी नक्त ओघ ६,४८९ कोटी रुपयांचा राहिला. त्या आधीच्या ऑगस्ट महिन्यांत समभागसंलग्न फंडातील (ईएलएसएस धरून) ९,०९० कोटी रुपयांचा नक्त ओघ होता. जुलैमध्ये ८,०९२ कोटी रुपये, जूनमध्ये ७,५८५ कोटी रुपये तर मे महिन्यात ४,९६८ कोटी रुपयांचा नक्त ओघ होता.

सप्टेंबरमध्ये सर्वाधिक १.५८ लाख कोटी रुपयांची निर्गुतवणूक ही रोखेसंलग्न फंडातून झाली. मुख्यत: लिक्विड फंडातून १.४१ लाख कोटी रुपये गुंतवणूकदारांनी काढून घेतले. प्रत्येक तिमाहीअंती, कंपन्यांना अग्रिम कर भरावयाचा असल्याने, त्यांच्याकडून लिक्विड फंडांमधून याच प्रकारे मोठय़ा प्रमाणात निधी काढून घेतला जातो. सप्टेंबरही तिमाही समाप्तीचा महिना असल्याने असे घडले असल्याचे अ‍ॅम्फीचे मुख्याधिकारी एन. एस. वेंकटेश यांनी नमूद केले.

‘एसआयपी’ ओघातील वाढ कायम

नक्त ओघ चार महिन्यांच्या नीचांकपदाला असला तरी, एकूण इक्विटी फंडातील मालमत्ता आधीच्या महिन्यातील ७.१६ लाख कोटींवरून, सप्टेंबरअखेर ७.५७ लाख कोटी रुपयांवर गेला आहे. या उद्योगात कार्यरत सर्व ४४ म्युच्युअल फंडांकडील एकूण गंगाजळीही महिनागणिक ४ टक्क्यांनी वाढली असून, ती २४.५१ लाख कोटींवरून, ती सप्टेंबरअखेर २५.४७ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. छोटय़ा गुंतवणूकदारांसाठी आकर्षक ठरलेल्या नियोजनबद्ध गुंतवणूक योजना अर्थात ‘एसआयपी’मार्फत गुंतवणुकीचा ओघही महिनागणिक ८,२३१ कोटींवरून, ८,२६३ कोटी रुपयांवर गेला आहे. ‘एसआयपी’ खात्यांची संख्याही सुमारे २.८१ कोटींवरून, सप्टेंबरअखेर २.८४ कोटींपर्यंत वाढले आहेत.

नवीन एसआयपी खात्यांच्या संख्येतील वाढ आणि त्याद्वारे वाढलेला ओघ हा छोटय़ा गुंतवणूकदारांची म्युच्युअल फंडांबाबत सकारात्मकता दर्शवितो. समभागसंलग्न फंडातील गुंतवणूक ही भांडवली बाजारातील कलाचे प्रतिबिंब असते. बाजाराचा कल सकारात्मक बनल्यास, ती गुंतवणूकही झेप घेताना दिसेल.

 एन. एस. वेंकटेश, ‘अ‍ॅम्फी’चे मुख्याधिकारी