29 May 2020

News Flash

बाजार पडझडीतही मार्चमध्ये ‘इक्विटी’ म्युच्युअल फंडांमध्ये विक्रमी ओघ

एकूण फंड गंगाजळीला मात्र पाच लाख कोटींनी ओहोटी

संग्रहित छायाचित्र

फेब्रुवारी व मार्च महिन्यांत भांडवली बाजारात निर्देशांकांनी ३० ते ३५ घसरण होऊन देखील मार्च महिन्यांत सर्वाधिक गुंतवणूक समभागसंलग्न फंडांमध्ये आल्याचे ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ (अ‍ॅम्फी) या देशातील ४० हून अधिक फंड घराण्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनेने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीतून दिसून आले.

मार्च महिन्यात उच्चांकी ३०,१०९ कोटींची गुंतवणूक समभागसंलग्न (इक्विटी) फंडांमध्ये झाली आहे, तर या महिन्यांत ११,४८५ कोटी रुपये हे नियोजनबद्ध गुंतवणूक अर्थात ‘एसआयपी’मार्फत गुंतविण्यात आले आहेत. एसआयपी गुंतवणुकीपैकी ८,६४१ कोटी समभागसंलग्न फंडात गुंतविण्यात आले आहेत. उल्लेखनीय म्हणजे आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये इक्विटी फंडात १०००८४ कोटी नियोजनबद्ध गुंतवणुकीतून आले आहेत. परंतु व्यापक बाजार घसरणीमुळे म्युच्युअल फंडांची एकूण गंगाजळी (व्यवस्थापनाखालील मालमत्ता) फेब्रुवारीतील २७.२३ लाख कोटींवरून घटून मार्च अखेरीस २२.२६ लाख कोटीवर आली असल्याचे दिसून आले.

मार्च महिन्यांत गुंतवणूकदारांची विशिष्ट फंड गटाला पसंती असल्याचे दिसून आले नाही. गुंतवणूकदारांनी २,२६८ कोटी मल्टीकॅप फंडात, २,०६० कोटी लार्जकॅप फंडात, २,००० कोटी फोकस्ड फंडात, १,५५१ कोटी ईएलएसएस फंडात आणि १,२३३ कोटी मिडकॅप फंडात गुंतविले. फेब्रुवारी महिन्यांतील ‘गोल्ड ईटीएफ’मधील १,४८३ कोटी गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यांत गुंतवणूकदारांनी १९५ कोटी रुपये ‘गोल्ड ईटीएफ’मधून काढून घेतले.

रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंड गटात क्रेडिट रिस्क फंडातून सर्वाधिक ५५६८ कोटींची रक्कम काढून घेण्यात आली. आयएल अँड एफएस, दिवाण हाऊसिंग फायनान्स (डीएचएफएल) आणि रिलायन्स होम फायनान्सच्या रेटिंग कंपन्यांनी पत घटविण्याची झळ क्रेडिट रिस्क फंडांना बसली आहे.

मार्च २०२०च्या म्युच्युअल फंड उद्योगातील मासिक आकडेवारीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ‘अ‍ॅम्फी’चे मुख्य कार्यकारी एन. एस. वेंकटेश म्हणाले, ‘एसआयपीमार्फत झालेल्या ११७२२.७४ कोटींच्या आणि समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडात आजवरची मासिक उच्चांकी ३०,१०९ कोटींची गुंतवणूक किरकोळ गुंतवणूकदारांनी केली आहे. लिक्विड फंड मालमत्तेतील घट ही मुखत्वे तिमाही आणि वर्षअखेरीस घडणारी गोष्ट असून बँका पर्याप्त भांडवलासाठी आणि कंपन्यांना त्यांच्या अग्रिम करविषयक गरजेसाठी या निधीची आवश्यकता भासते. एप्रिल महिन्यांत हे पैसे परत येतील.’’

आर्थिक वर्ष २०१९ मध्ये इक्विटी फंडातील एसआयपी गुंतवणूक ९२ हजार कोटींची होती, आर्थिक वर्ष २०२० मध्ये वाढून तिने एक लाखाचा टप्पा ओलांडला ही सुखद बाब आहे. याने किरकोळ गुंतवणूकदारांना एसआयपी हा संपत्ती निर्मितीचा सर्वोत्तम मार्ग आहे हे पटले असल्याचे दिसून येते. २२ ते २५ टक्कय़ांच्या निर्देशांकाच्या तुलनेत मालमत्तेतील घट केवळ ६.६४ टक्केच आहे. आगामी आर्थिक वर्षांत म्युच्युअल फंड गंगाजळी नवनवीन शिखरे पादाक्रांत करेल असा आशावाद वेंकटेश यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2020 12:10 am

Web Title: equity mutual funds sell out in march despite market collapse abn 97equity mutual funds sell out in march despite market collapse abn 97
Next Stories
1 औद्योगिक उत्पादन दरात फेब्रुवारीत ४.५ टक्के वाढ
2 Coronavirus : आयकर विभागाकडून दिलासा; ५ लाखांपर्यंतचे रिफंड त्वरित मिळणार
3 भारतात ४० कोटी लोक दारिद्रय़ाच्या खाईत?
Just Now!
X