चित्रपट निर्मिती आणि वितरणातील अग्रणी इरॉस इंटरनॅशनलने ऑनलाइन मनोरंजनाच्या क्षेत्रात पाऊल टाकून ‘इरॉसनाऊ’ या नव्या व्यासपीठाची घोषणा केली आहे. सुमारे १६० कोटी रुपयांच्या (२५ दशलक्ष अमेरिकी डॉलर) गुंतवणूक या उपक्रमासाठी कंपनीने केली आहे.
या व्यासपीठावरून दर्जेदार बॉलीवूडपटांचे अगदी दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या आधी प्रक्षेपणासह, इरॉस नाऊवर मनोरंजन जगतातील ताज्या घडामोडी, टीव्ही शो, म्युझिक व्हिडीओ आणि ऑडियो ट्रॅक्सचा प्रचंड मोठा संग्रह असेल, ज्यातून एक चित्रपट निर्मिती करणाऱ्या स्टुडिओ ते डिजिटल कंपनी म्हणून संक्रमण घडून येईल, असा विश्वास इरॉस इंटरनॅशनलच्या समूह कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालिका ज्योती देशपांडे यांनी व्यक्त केला.
इरॉसनाऊने प्रारंभिक टप्प्यातच सुमारे १.९ कोटी नोंदणीकृत यूजर्स मिळविले आहेत. चालू वर्षांत या उपक्रमावर आणखी २५ दशलक्ष डॉलरच्या गुंतवणुकीचे नियोजन असल्याचे या न्यूयॉर्क शेअर बाजारस्थित कंपनीने स्पष्ट केले आहे. अलीकडे दूरचित्रवाणीवर दर्जेदार कार्यक्रमाची वानवा असताना, जनसामान्यांचा मनोरंजनाची भूक ही स्मार्टफोनद्वारे भागविली जात असून, हीच इरॉसनाऊसाठी मोठी व्यवसायाची संधी ठरेल, असे देशपांडे यांनी स्पष्ट केले.
प्रारंभीच्या काळात तरी या वेब आणि अँड्रॉइड फोनवर उपलब्ध व्यासपीठावर कन्टेंट हा विनामूल्य असेल, पण भविष्यात प्रति माह ठरावीक दराने ग्राहक वर्ग मिळविण्याची योजना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.