15 October 2019

News Flash

‘एस्सार ग्लोबल’कडून कर्जदारांची सर्व देणी अखेर चुकती

कर्जाचा हा आकडा कंपनी समूहाच्या एकूण कर्जापैकी ८० टक्के आहे.

(संग्रहित छायाचित्र)

देश-विदेशातील १२,००० कोटींच्या देणीची समूहाकडून शेवटच्या हप्त्यात पूर्तता

मुंबई : ‘एस्सार ग्रुप ऑफ कंपनीज’च्या ताब्यातील ‘एस्सार ग्लोबल फंड लिमिडेट’ (एस्सार ग्लोबल) या कंपनीने सोमवारी भारतीय तसेच विदेशातील कर्जदारांकडील १२,००० कोटींच्या कर्जाची परतफेड करून कर्जपूर्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. ‘एस्सार ऑईल’च्या मिळकतीमधून कंपनीने ऑगस्ट २०१७ मध्ये विविध कर्जदारांकडील आणखी ३०,००० कोटीची देणी परत केली होती.

‘एस्सार’ समूहाने ‘एस्सार स्टील’कडे असलेल्या कर्जासह गेल्या दोन वर्षांंमध्ये एकूण १ कोटी ३७ हजारपेक्षा अधिक रकमेच्या कर्जाची परतफेड केली आहे. या कर्जापैकी मोठी रक्कम भारतीय बॅंक प्रक्रियेशी निगडीत होती. कर्जाचा हा आकडा कंपनी समूहाच्या एकूण कर्जापैकी ८० टक्के आहे.

‘एस्सार ग्लोबल’ने आतापर्यंत आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बॅंक आणि स्टॅंडर्ड चार्टर्ड बँक यांच्याकडील ६,३०० कोटींच्या कर्जाची परतफेड केली आहे. त्यामुळे या बॅंकांकडून २००८ ते २०१४ या कालावधीदरम्यान ‘एस्सार ग्लोबल’ला झालेल्या भांडवली खर्च कार्यक्रमातील ३१,५०० कोटींच्या देणीची पूर्तता झाली आहे.

सध्या ‘एस्सार ग्लोबल’ला एकमेव कर्जपुरवठा करणारी कंपनी ‘व्हीटीबी’ आहे. ही कंपनी ‘एस्सार’बरोबर गेल्या तीन वर्षांंपासून कार्यरत असून ‘एस्सार’च्या मालमत्ता व्यवस्थापन, ताळेबंद प्रक्रियेत सुसूत्रता आणणे आणि या कंपनीला पुन्हा यशाच्या मार्गावर नेण्याचे काम करीत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

‘एस्सार ग्लोबल’ने कर्जफेडीबरोबरच ‘एस्सार स्टील मिनीसोटा लिमिटेड’ला विविध कंपन्यांकडून मिळालेल्या कर्जसंदर्भात सुविधांबाबतही तोडगा काढला आहे.

आयसीआयसीआय बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया या दोन भारतीय बँका तसेच आंतरराष्ट्रीय निधीदार ‘डेव्हिडसन केम्पनर’ यांचाही यात समावेश आहे. यानुसार ‘एस्सार ग्लोबल’ने ‘मेसाबी मेटॅलिक्स’कडून मंजूर झालेले २.५० कोटी डॉलर दर्शनी मूल्य असलेले चलन खरेदी केले आहे.

यामुळे ‘मेसाबी’कडील सर्व कर्जाची परतफेड झाली असून ‘एस्सार ग्लोबल’चा अमेरिकेमधील मिनिसोटा येथे उभारण्यात येणाऱ्या  कमी किंमतीमधील लोखंडांच्या खाणी सुरू करण्याच्या प्रकल्पाचा रस्ता मोकळा झाल्याचे मानले जाते.

First Published on January 8, 2019 2:46 am

Web Title: essar global repays all debt to indian and foreign lenders