एस्सार शिपिंगने पॅनामॅक्स या मालवाहू जहाजाचा ताबा मिळविल्याची मंगळवारी घोषणा केली, यातून कंपनीचा जहाजांचा ताफा १४वर गेला आहे. मार्चमध्ये कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या ताफ्यातील जुन्या जहाजांची विक्री करून नवीन जहाजांच्या खरेदीचा निर्णय घेतला होता, त्यानुसार पडलेले हे पाऊल आहे.

या जहाजाच्या अधिग्रहणासह कंपनीची एकूण मालवाहू क्षमता १६ लाख टनांवर गेली असून, ताफ्यातील जहाजांचे सरासरी आयुर्मान १३.५ वर्षांवरून १२ वर्षे असे खाली आले आहे. २००० साली बांधण्यात आलेल्या एमव्ही महावीर अर्थात ७४,००५ डीडब्ल्यूटी वाहक क्षमतेच्या सेकंड हँड पॅनामॅक्स जहाज ताब्यात घेतल्याचे एस्सार शिपिंगने मंगळवारी मुंबई शेअर बाजाराला सूचित केले.

एस्सार शिपिंगचे कार्यकारी संचालक आणि मुख्याधिकारी रणजीत सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यांत कंपनीने २८ वर्षे सेवेत असलेल्या एमव्ही चंडी प्रसाद या जहाजाला निवृत्ती दिली आणि एमव्ही महावीर हे त्याची जागा व्यापणारा सुयोग्य पर्याय आहे. एस्सार स्टीलच्या पारादीप येथील पोलाद प्रकल्पातून हाजिरा येथील प्रकल्पापर्यंत पोलादी पत्रे, कोळसा आणि चुनखडी वाहून नेण्यासाठी एमव्ही महावीर वापरात येणार आहे.