पदार्पणालाच दुपटीने परतावा गुंतवणूकदारांच्या पदरी टाकणाऱ्या ‘डी-मार्ट’च्या दमदार भागविक्रीने आर्थिक वर्ष २०१६-१७ ची प्रारंभिक भांडवली बाजाराने बहारदार सांगता केली. सरलेले आर्थिक वर्षांत प्रारंभिक भागविक्रीतून जवळपास दुप्पट म्हणजे २८,२११ कोटींचा निधी कंपन्यांनी उभारला. २०१५-१६ वर्षांत तो १४,५०० कोटी, तर त्या आधीच्या वर्षांत अवघा २,७७० कोटी रुपये इतकाच होता. हे पाहता विद्यमान २०१७-१८ वर्षांत दृष्टिपथात असलेल्या बडय़ा कंपन्यांचे बाजारातील पदार्पण पाहता, गुंतवणूकदारांकडून उभ्या केल्या जाणाऱ्या निधीचे प्रमाण ३५ ते ४० हजार कोटींच्या घरात राहण्याचा अंदाज आहे.

प्रारंभिक भांडवली बाजारातील निधी उभारणी ही प्रत्यक्ष बाजार तेजीचा असताना चांगलेच बहरते असा आजवरचा अनुभव आहे. बाजार निर्देशांकांनी नवीन २०१७-१८ आर्थिक वर्षांत सार्वकालिक उच्चांकाला गवसणी घालूनच प्रवेश केला आहे. दलाल-स्ट्रीटवरील तेजीचा बैल चौखूर उधळत असून, ही तर मोठय़ा दीघरेद्देशी तेजीची सुरुवात असल्याचे विश्लेषकांचे कयास आहेत. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकांनी नवनवीन उच्चांकी कळसांना चालू वर्षांत गाठणे केवळ क्रमप्राप्त असून, ही बाब प्रारंभिक भागविक्री (आयपीओ) बाजारालाही बळकटी देणारी ठरेल.

mutual fund, market, investment, Assets, small cap
स्मॉल कॅप फंडांमधील मालमत्ता २.४३ लाख कोटींवर
400 lakh crore market cap milestone of Mumbai Stock Exchange
विश्लेषण : ७५ हजारांचे शिखर… ४०० लाख कोटींचे बाजारभांडवल… शेअर बाजार आणखी किती तेजी दाखवणार?
IPO, financial year 2023-24, investments, companies, 62,000 crore,
‘आयपीओ’द्वारे २०२३-२४ मध्ये ६२,००० कोटींची निधी उभारणी
Stock market indices Sensex and Nifty registered gains
अर्थवर्षाची निर्देशांक तेजीनेच सांगता; वर्षभरात सेन्सेक्सची २४.८५ टक्के, तर निफ्टीची २८.६१ टक्के झेप

प्रारंभिक बाजारपेठेचा २०१६-१७ सालातील बहराचा केंद्र सरकारलाही भरपूर लाभ झाला आहे. सरकारने बाजारातून ४०,९९७ कोटी रुपये सरलेल्या आर्थिक वर्षांत उभारले. प्रत्यक्ष निर्गुतवणुकीतून केंद्र सरकारने अर्थसंकल्पातील मूळ उद्दिष्टानुसार ५६,५०० कोटी रुपये उभारावयाचे होते. तरी सुधारित ४५,५०० कोटींच्या उद्दिष्टापैकी ९० टक्के लक्ष्य गाठण्यात सरकारला यश आले आहे. गत काही वर्षांतील निर्गुतवणुकीच्या आघाडीवर सरकारची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही, हे पाहता यंदा उभारलेले ४०,९९७ कोटी रुपये हे मोदी सरकारचे मोठे सुयशच म्हणावे लागेल.

नवीन २०१७-१८ आर्थिक वर्षांसाठी सरकारने ६२,००० कोटी रुपयांचे निर्गुतवणुकीचे उद्दिष्ट ठेवले आहे. तर खासगी क्षेत्रातील कंपन्यांतून आणखी ४०,००० कोटी रुपये बाजारातून उभारले जाण्याचा अंदाज आहे.

प्रस्तावित लक्षणीय भागविक्री

येत्या काळात अनेक बडय़ा खासगी कंपन्या पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी भांडवली बाजाराचा मार्ग चोखाळणे अपेक्षित आहे. अनेकांनी समभागांच्या प्रारंभिक विक्रीतून भांडवल उभारण्याचे प्रस्ताव ‘सेबी’कडे दाखलही केले आहेत. त्यातील लक्षणीय नावांमध्ये – राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई), गो-एअर, हडको, सीडीएसएल, एसबीआय लाइफ, अ‍ॅस्टर डीएम हेल्थकेअर, सिक्युरिटी अ‍ॅण्ड इंटेलिजन्स सव्‍‌र्हिसेस, कॉन्टिनेंटल वेअर हाऊसिंग, नक्षत्र वर्ल्ड वगैरेंचा प्राधान्याने उल्लेख करावा लागेल. विविध १३ कंपन्यांनी भागविक्रीसाठी ‘सेबी’चा हिरवा कंदील मिळविला असून, त्या एकत्रितपणे ९,२३० कोटी रुपये दिवाळीपर्यंत उभारतील, तर १६,७३६ कोटी रुपये उभारणे प्रस्तावित असलेल्या अन्य १० कंपन्या ‘सेबी’च्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्या, तसेच आयआरसीटीसी, आयआरएफसी वगैरेसारख्या नफ्यातील सार्वजनिक उपक्रमांच्या बाजारात सूचिबद्धतेचा मानस केंद्र सरकारने स्पष्ट केला आहे. त्यामुळे प्रारंभिक भागविक्री बाजारपेठेचा उत्साह दुणावला जाईल, अशी सरकारकडूनही पावले पडणे अपेक्षित आहे.

  • एनएसई, गो-एअर, हडको, सीडीएसएल, एसबीआय लाइफ, अ‍ॅस्टर डीएम हेल्थकेअर, सिक्युरिटी अ‍ॅण्ड इंटेलिजन्स सव्‍‌र्हिसेस, कॉन्टिनेंटल वेअर हाऊसिंग, नक्षत्र वर्ल्ड वगैरे खासगी कंपन्या.
  • सरकारी सामान्य विमा कंपन्या, आयआरसीटीसी, आयआरएफसी वगैरे सरकारी कंपन्या.