News Flash

सरकारी रोख्यात गुंतवणूक असलेला ‘ईटीएफ’आजपासून व्यवहारास खुला

मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या शुक्रवारच्या कामकाज सत्रापासून एका नवीन पर्वाला सुरुवात होत आहे.

| January 2, 2015 01:02 am

मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या शुक्रवारच्या कामकाज सत्रापासून एका नवीन पर्वाला सुरुवात होत आहे. भारतात प्रथमच सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक असणाऱ्या आणि गुंतवणुकीस कायम खुल्या असलेल्या एक्स्चेंज ट्रेडेड फंडाची (ईटीएफ) नोंदणी दोन्ही शेअर बाजारांत होत असून शुक्रवारपासून त्यात नियमित व्यवहार खुले होतील. ‘एलआयसी नोमुरा जी-सेक लाँगटर्म ईटीएफ’ हा देशातील पहिला सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक असलेला व शेअर बाजारात सूचिबद्ध फंड असेल.
या फंडासाठी इंडिया इंडेक्स सव्‍‌र्हिसेस अँड प्रॉडक्ट्स या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या उपकंपनीने आठ ते १२ वर्षे मुदत शिल्लक असलेले व सर्वाधिक व्यवहार असलेले पाच सरकारी रोखे निवडून, सरकारी रोख्यांचा निर्देशांक बनविला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या रोखे मंचावर व सरकारी रोखे व्यवहारांसाठी वापरल्या जाणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या रोखे मंचावर होणाऱ्या या पाच रोख्यांच्या किमतीवर हा निर्देशांक दर तासाला अद्ययावत केला जाईल. ३१ मार्च २०१५ पर्यंत हा निर्देशांक वापरण्याचे हक्क केवळ एलआयसी नोमुराकडे आहेत.
एलआयसी नोमुराने या ईटीएफच्या खुल्या विक्रीतून ७० कोटी रुपये जमा केले आहेत. प्रत्येकी १० रु. दर्शनी मूल्याच्या युनिट्सचे गुंतवणूकदारांना वितरण २४ डिसेंबर रोजी या निर्देशांकानुसार, प्रत्येकी १३.४१ रु. दराने करण्यात आले आहे. भविष्यात या फंडाची मालमत्ता वाढेल, असा आशावाद एलआयसी नोमुरा म्युच्युअल फंडाचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश साठे यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केला.
एलआयसी नोमुरा म्युच्युअल फंडाने विमा नियमन व विकास प्राधिकरणाकडे (आयआरडीए) विमा कंपन्यांसाठी असलेल्या ‘मान्यताप्राप्त गुंतवणुकां’च्या यादीत या फंडाचा समावेश व्हावा, यासाठीही कार्यवाही सुरू केली आहे. या फंडातील गुंतवणूक सरकारी रोख्यांमध्ये असल्याने रिझव्‍‌र्ह बँकेच्या तरलतेच्या गुंतवणुकांच्या (एसएलआर) यादीतही या योजनेचा समावेश व्हावा, यासाठी अर्ज करणार असल्याचे साठे यांनी सांगितले. अशी मान्यता मिळाल्यास बँकाही या फंडात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करतील.

विमा कंपन्यांसाठी असलेल्या ‘मान्यताप्राप्त गुंतवणुकां’च्या यादीत या फंडाचा समावेश व्हावा, तसेच या फंडातील गुंतवणूक सरकारी रोख्यांमध्ये असल्याने रिझव्‍‌र्ह बँकेच्या तरलतेच्या गुंतवणुकांच्या (एसएलआर) यादीतही या योजनेचा समावेश व्हावा, असे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक येऊन या फंडाची मालमत्ता वाढेल.
– नीलेश साठे
एलआयसी नोमुरा म्युच्युअल फंडाचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 1:02 am

Web Title: etf files for shares on nasdaq more to be revealed in january
टॅग : Shares
Next Stories
1 कच्च्या तेलाच्या घसरत्या किमतींचा सुपरिणाम
2 गॅस सिलिंडर अनुदान आजपासून थेट बँक खात्यात
3 महाराष्ट्रात दोन कोटी लाभार्थी
Just Now!
X