हैदराबादस्थित ‘ईट्रिओ’ला परवाना

मुंबई : महागडय़ा आणि प्रदूषणपूरक पेट्रोल किंवा डिझेल इंधनाला पर्याय म्हणून विजेवर चालणाऱ्या मोटारींकडे उद्याचा भविष्यकाळ म्हणून पाहिले जाते. भारतातही अशा मोटारी अर्थात ईव्ही (इलेक्ट्रिक व्हेइकल)मध्ये उत्पादकांचे स्वारस्य दिसत असले तरी वार्षिक उत्पादनाचा दर अद्याप नगण्यच आहे. या पाश्र्वभूमीवर प्रचलित इंधनावर चालणाऱ्या मोटारींचे शुद्ध ईव्ही मोटारीत रूपांतरण (रेट्रोफिटिंग) शक्य असून, रूपांतरणाचे प्रमाणन  हैदराबादस्थित ईट्रिओ ऑटोमोबाइल्स या कंपनीने मिळविली आहे.

अशा प्रकारची मंजुरी मिळविणारी ईट्रिओ ही पहिली प्रमाणित भारतीय कंपनी आहे. कंपनीने हैदराबाद (तेलंगणा) येथील आपल्या प्रकल्पामध्ये अशा रूपांतरित मोटारींच्या पहिल्या तुकडीची निर्मिती केली आहे.

ईट्रिओ ऑटोमोबाइल्स या कंपनीने पहिल्या टप्प्यातील प्रमाणपत्रांसाठी विविध १० मोटारींच्या मॉडेलवर आधीपासूनच काम केले आहे आणि सुरुवातीच्या ग्राहकांसाठी जवळपास ५० कारचा यशस्वी वापरही करून दाखविला आहे, तर प्रथम प्रमाणित रेट्रोफिटिंग केलेल्या विद्युत मोटारीने यशस्वीपणे तेलंगणा प्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणीही पूर्ण केली आहे.

सध्या केवळ मोठा वाहन ताफा असलेल्या टॅक्सी कंपन्यांबरोबर रेट्रोफिट मोटारींबाबत काम सुरू असल्याचे इट्रिओचे मुख्य परिचालन अधिकारी नितीश भंडारी यांनी स्पष्ट केले,

परंतु नजीकच्या काळात मागणी वाढणे अपेक्षित असून, संपूर्ण देशभरात फ्रँचाइजी तत्त्वावर  व्यवसाय भागीदार तसेच गुंतवणूकदारांचाही शोध सुरू आहे, असे भंडारी यांनी सांगितले.