अर्थव्यवस्थेसाठी दुहेरी शुभसंकेत..

देशाच्या उद्योग क्षेत्राच्या तब्येतीचे निदर्शक असलेल्या औद्योगिक उत्पादन दराने सरलेल्या ऑक्टोबरमध्ये ८.१ टक्क्य़ांची पातळी गाठली असून, तो गेल्या ११ महिन्यांतील उच्चांकी स्तर आहे. त्याच वेळी किरकोळ किमतींवर आधारित महागाई दरही नोव्हेंबर महिन्यात तीन टक्क्य़ांखाली दिलासादायी स्थिरावला असल्याचे दिसून आले. बुधवारी सायंकाळी जाहीर झालेल्या या दोन महत्त्वाच्या आकडेवारी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने शुभसंकेतच ठरल्या आहेत.

औद्योगिक उत्पादन दराने आधीच्या सप्टेंबरमधील ४.५ टक्क्य़ांच्या तुलनेत जवळपास दुपटीने उसळी घेत ऑक्टोबरमध्ये ८.२ टक्क्य़ांची पातळी गाठल्याचे केंद्रीय सांख्यिकी संघटनेच्या आकडेवारीवरून बुधवारी स्पष्ट झाले. उल्लेखनीय म्हणजे कमालीचे नरमलेल्या खाणकाम, ऊर्जा आणि निर्मिती क्षेत्रांत दिसलेला उत्साह आणि भांडवली त्याचप्रमाणे ग्राहकोपयोगी वस्तूंच्या मागणीत झालेल्या वाढीने हा परिणाम साधला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर २०१७ मध्ये औद्योगिक उत्पादन दर १.८ टक्के पातळीवर होता.

ऊर्जानिर्मिती क्षेत्रातून उत्पादन दराने तर १०.८ टक्क्य़ांची आणि भांडवली वस्तू क्षेत्राचा वृद्धिदर १६.८ टक्के पातळीवर होता. गेल्या वर्षी याच महिन्यात त्यांचे प्रमाण अनुक्रमे ३.२ टक्के आणि ३.५ टक्के असे होते. ग्राहकोपयोगी वस्तू निर्माण क्षेत्रानेही मागील ९ टक्क्य़ांच्या तुलनेत यंदा १७.६ टक्के दराने वाढ दर्शविली. खाणकाम क्षेत्राची वाटचाल ऑक्टोबर २०१७ मध्ये उणे ०.२ टक्के दराने सुरू होती. यंदा मात्र हे क्षेत्र ७ टक्के दराने वाढताना दिसले. निर्मिती क्षेत्रातील २३ पैकी २१ उद्योगगटांसाठी सरलेला ऑक्टोबर महिना सकारात्मक वाढीचा राहिला.

दुसरीकडे महागाईच्या आघाडीवर दिलासा अर्थव्यवस्था आणि सर्वसामान्यांना बुधवारी प्रसिद्ध आकडेवारीने दिला. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर नोव्हेंबरमध्ये २.३३ टक्के नोंदविण्यात आला. महागाई दराचा ही मागील दीड वर्षांतील नीचांक स्तर आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये महागाई दर ३.३८ टक्के (सुधारित आकडेवारीनुसार) पातळीवर, तर मागील वर्षी नोव्हेंबर २०१७ मध्ये महागाई दर ४.८८ टक्के असा होता.

गेल्या सलग चार महिन्यांपासून महागाई दरात निरंतर उतार सुरू आहे. यंदा नोंदविल्या गेलेल्या २.३३ टक्के महागाई दरापेक्षा कमी १.४६ टक्क्य़ांचा दर जून २०१७ मध्ये नोंदविला गेला आहे.