गुंतवणूकदारांना तज्ज्ञांचा सल्ला

आर्थिक मंदीसदृश स्थितीत आपल्या उत्पन्नाबरोबरच गुंतवणुकीबाबत चिंता असणे स्वाभाविक आहे; मात्र गुंतवणुकीसाठी हिच खरी संधी मानून पुढील प्रवास करावा, असे मार्गदर्शन तज्ज्ञ सल्लागारांनी रविवारी वसई येथे केले. आपले ध्येय आणि आर्थिक नियोजनाबरोबरच नियमितता, शिस्त व संयमही तेवढाच आवश्यक असल्याचे मत या तज्ज्ञांनी यावेळी व्यक्त केले.

आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थसत्ता’ गुंतवणूकपर मार्गदर्शन झाले. त्यावेळी उपस्थित गुंतवणूकदारांनी आपल्या शंकांचे निरसनही तज्ज्ञांमार्फत करून घेतले. गुंतवणूकविषयक पर्वातील चौथे सत्र वसईकरांसाठी आयोजित करण्यात आले होते. त्याला उपस्थितांनी प्रतिसाद दिला. यावेळी पाहुण्यांचे स्वागतही करण्यात आले.

‘लोकसत्ता’चे वीरेंद्र तळेगावकर यांनी सुसंवादकाची भूमिका पार पाडली. अर्थशास्राचे प्राध्यापक कौस्तुभ जोशी यां नी आर्थिक नियोजनाबाबत गुंतवणुकीचे विविध पर्याय व वयाच्या विविध टप्प्यातील गुंतवणूक याबाबत मार्गदर्शन केले. गुंतवणुकीबाबत आर्थिक शिस्त महत्त्वाची असून संयमही तेवढाच महत्त्वाचा असणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. आर्थिक नियोजनकार सुयोग काळे यांनी म्युच्युअल फंड व भांडवली बाजार या विषयावर मत मांडताना म्युच्युअल फंडांचे प्रकार, त्यांची वैशिष्टय़े स्पष्ट केली. फंडातील गुंतवणूक दीर्घकालीन असेल आणि योग्य अभ्यासाने ती केली तर परतावा निश्चितच आहे, असे नमूद केले. आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडच्या मुंबई परिमंडळाचे प्रमुख अमित मांजरेकर यांनी गुतवणुकीच्या नियोजनासाठी आर्थिक सल्लागार आवश्यक असून त्याला आपल्या ध्येयाप्रती स्पष्ट कल्पना देणे आवश्यक असल्याचे सांगितले. आपण आपल्या आरोग्याबद्दल जेवढे जागरुक असतो तेवढेच्या आपल्या आर्थिक आरोग्याबाबतचे भान आपल्याला असायला हवे, असे ते म्हणाले.

आपले उद्दीष्ट आणि उपलब्ध योजना यांची सांगड घालून योग्य पद्धतीने गुंतवणूक नियोजन करा. – कौस्तुभ जोशी.

आपल्या उद्दीष्टाप्रती प्रामाणिक राहून उत्पन्न, खर्च याबरोरच बचत व गुंतवणुकीबाबत ताळमेळ राखा. – सुयोग काळे.

आपल्या शारीरिक आरोग्याबरोबरच सक्षम आर्थिक आरोग्यासाठी सजग राहा. – अमित मांजरेकर.