स्थिर उत्पन्न देणाऱ्या मुदत ठेवींवरील व्याजदर कपातीची टांगती तलवार, रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदरात बदल न केल्याने सुटलेली स्वस्त कर्जाची संधी, मुंबई शेअर बाजाराचा गेल्या काही दिवसांपासूनचा २५ हजारांच्या आतील मुक्काम असे सारे नकारात्मक वातावरण चोहोबाजूंना असले तरी गुंतवणुकीच्या पदपथावरील प्रवास मुळीच थांबवू नका; गुंतवणुकीतील सातत्य कोणत्याही परिस्थितीत जोपासा, असा सल्ला तज्ज्ञांनी ‘लोकसत्ता अर्थसल्ला’च्या व्यासपीठावर दिला.
‘दिशा डायरेक्ट’ प्रस्तुत ‘लोकसत्ता – अर्थसल्ला’ उपक्रमाचा शुभारंभ मंगळवारी सायंकाळी झाला. दादर (पश्चिम) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहातील या कार्यक्रमाचे सह-प्रायोजक न्यू इंडिया अ‍ॅशुरन्स कंपनी लिमिटेड होते. शेअर बाजार, म्युच्युअल फंड, मुदत ठेवी, विमा-निवृत्तिवेतन योजना अशा साऱ्या गुंतवणूक प्रकार व पर्यायांचा तज्ज्ञांनी केलेला ऊहापोह गर्दीने खच्चून भरलेल्या ‘लोकसत्ता’च्या अर्थउत्सुक वाचकांनी आत्मसात केला.
आर्थिक सल्लागार वसंत कुलकर्णी, निवृत्तिवेतन विषयक अभ्यासक मििलद अंध्रूटकर व शेअर बाजाराचे विश्लेषक आशीष ठाकूर यांनी वेगवेगळ्या गुंतवणूकविषयक क्षेत्रांतील सोदाहरण गुंतवणुकीचे महत्त्व या वेळी पटवून दिले. सुनील वालावलकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
प्रश्नोत्तर सत्राच्या माध्यमातून श्रोत्यांच्या शंकांचे निरसन या वेळी झाले. या संवादपर कार्यक्रमाचा उपस्थितांनी दृक्श्राव्य माध्यमातूनही आस्वाद घेतला.
गती घेत नसलेली देशाची अर्थव्यवस्था व तुलनेत दिवसागणिक वाढत जाणारी महागाई आणि फारसे बदल होत नसलेले उत्पन्न-वेतन या पाश्र्वभूमीवर प्रत्येक वक्त्याने त्याच्या सादरीकरणासह गुंतवणूक, बचत, खर्च, भविष्यातील आर्थिक तरतूद याविषयीचे महत्त्व या वेळी स्पष्ट केले. उपलब्ध असलेले निरनिराळे गुंतवणूक प्रकार, गुंतवणूकदारांची निकड व लक्ष्य यांचे सविस्तर वर्गीकरण व विवेचन तज्ज्ञांनी या वेळी केले.
उपस्थित श्रोत्यांनीही वैयक्तिक गुंतवणुकीसह अमुक गुंतवणूक प्रकार, त्यांची व्याख्या, त्यातील परतावा आदी शंकांचे समाधान करून घेतले. गुंतवणुकीकरिता एखादा अभ्यासक्रम आहे का इथपासून ते रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदर न वाढवताही सेन्सेक्स का पडला, अशा आशयाचे प्रश्न ‘लोकसत्ता – अर्थसल्ला’च्या मंचावरून या वेळी विचारले. ठाकूर यांनी, बाजारात खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना केवळ संबंधित कंपनीचे समभाग मूल्यच गृहीत धरू नये तर व्यवहार होणाऱ्या कंपनीच्या समभागांची संख्या, त्याच्याशी-संबंधित कंपनीच्या क्षेत्राशी निगडित घडामोडी यावरही नजर ठेवण्यास सुचविले. ‘एसआयपी’सारख्या योजना खंडित करू नका असे सांगतानाच छोटी बचतही जास्तीत जास्त करा, असेही ते म्हणाले. अंध्रूटकर यांनी, ‘पीपीएफ’, ‘पीएफ’, ‘एनपीएस’ अशा निवृत्तिवेतन योजनांमधील फरक समजावून सांगत ‘एनपीएस’ची गुंतवणूक ते कर अशी सर्वागीण माहिती या वेळी दिली. गुंतवणूक सल्लागार वसंत कुलकर्णी यांनी, गुंतवणुकीत सातत्य राखा आणि कोणत्याही गुंतवणुकीबाबत घाईने निर्णय घेणे टाळा, असा सल्ला या वेळी दिला. गुंतवणुकीचा आढावा किमान वर्षांतून एकदा घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.