आठ ते दहा पटीने भाडेवाढ

पुणे : ठरावीक दलालांच्या एकाधिकारशाहीमुळे अन्नधान्य तसेच अन्य मालाची निर्यात करण्यासाठी आवश्यक असलेल्या कंटनेरच्या भाड्यात सातत्याने वाढ होत असून सध्या निर्यातीच्या कंटेनरचे भाडे हजार ते बाराशे डॉलरवरून तब्बल आठ ते नऊ हजार रुपये डॉलरवर पोहोचले आहे. आठ ते दहा पटीतील कंटेनरच्या भाडेवाढीमुळे निर्यातीस खीळ बसण्याची व्यापाऱ्यांनी भीती व्यक्त केली आहे.

सागरी वाहतुकीसाठी कंटेनरचा वापर केला जातो. सध्या परदेशात निर्यातीसाठी पाठविल्या जाणाऱ्या कंटेनरची उपलब्धता खूपच कमी असून, काही ठरावीक दलालांकडे (एजंट्स) ते आहेत. अपुऱ्या उपलब्धतेमुळे सहा महिन्यांपूर्वी एक हजार ते बाराशे डॉलर भाडे असलेल्या कंटेनरचे भाडे सध्या आठ ते नऊ हजार डॉलरवर गेले आहेत.

अशा स्थितीत कंटनेरची संख्या, त्यांची उपलब्धता याबाबतची माहिती केंद्र सरकारने संकेतस्थळावर द्यावी. जेणेकरून प्रत्येक निर्यातदाराला कंटेनरची उपलब्धता आणि भाडे याबाबतची माहिती उपलब्ध होईल, अशी सूचना मार्केट यार्डातील प्रमुख तांदूळ निर्यातदार, फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्रचे (फॅम) वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी केली आहे.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी देशभरातील व्यापारी आणि उद्योग संस्थांच्या प्रतिनिधींना नुकतेच दिल्लीत एका बैठकीसाठी बोलाविले होते. या बैठकीत ‘फॅम’चे दोन प्रतिनिधी सहभागी झाले होते. या बैठकीत व्यापाऱ्यांनी त्यांच्या समस्या तसेच मागण्या मांडल्या. सरकारने ‘रोडरेप’चे (रेमिशन ऑफ ड्युटीज अँड टॅक्सेस ऑन एक्सपोर्ट प्रॉडक्ट्स) दर वाढविण्याची विनंती केली आहे. सध्या काही वस्तूंचा समावेश ‘रोडरेप’मध्ये होत नाही. त्या वस्तूंचा समावेश करण्याची विनंती सरकारकडून करण्यात आली आहे. त्याचे दर वाढविल्यास निर्यातदारांना फायदा होईल आणि निर्यातही वाढेल, असे सांगण्यात आले.

व्यापाऱ्यांची मागणी

जगभरातील विविध देशांत भारतीय दूतावास आहे. त्या दूतावासांमधून त्या देशातील विक्रेते आणि खरेदीदारांची माहिती उपलब्ध करून दिली गेली, तर त्याचा फायदा निर्यातदारांना होईल. यासाठी संगणकीय प्रणालीवर आधारित केंद्र कार्यान्वित करण्यात यावे, अशी  व्यापाऱ्यांनी मागणी केली आहे.