नवी दिल्ली : भारतातून होणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या निर्यातीत गत सात महिन्यांत पहिल्यांदाच वाढ दिसून आली आहे. वाणिज्य मंत्रालयाकडून शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार,  फेब्रुवारी महिन्यात २.९१ टक्के वाढीसह २७.६५ अब्ज अमेरिकी डॉलरची निर्यात देशातून झाली.

बरोबरीने सरलेल्या महिन्यात आयातही २.४८ टक्क्यांनी वाढून ३७.५ अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचली आहे. त्यामुळे आयात-निर्यातीतील तफावत असलेली व्यापार तूट ही ९.८५ अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचली आहे. गतवर्षी म्हणजे फेब्रुवारी २०१९ मध्ये व्यापार तूट ९.७२ अब्ज डॉलर इतकी होती.

आयातीत वाढीसाठी प्रामुख्याने खनिज तेलाच्या आयातीतील वाढीचे सर्वाधिक योगदान आहे. फेब्रुवारीत खनिज तेल आयात १४.२६ टक्क्यांनी वाढून १०.७६ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे. वर्षभरापूर्वी फेब्रुवारीत तेल आयातीचे प्रमाण ९.४१ अब्ज डॉलर इतके होते.

चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२० या ११ महिन्यांच्या काळातील देशातून झालेल्या निर्यातीचे प्रमाण २९२.९१ अब्ज डॉलर असे आहे. ते आधीच्या वर्षांतील याच ११ महिन्यांच्या तुलनेत १.५ टक्के कमी आहे. तर याच ११ महिन्यांत आयात ७.३० टक्क्यांनी वाढली आहे आणि ती ४३६ अब्ज अमेरिकी डॉलर अशी आहे. परिणामी दोहोंतील तफावत असलेली व्यापार तूट १४३.१२ अब्ज डॉलरच्या पातळीवर गेली आहे.